१० दिवसांपूर्वी टाकलेली खडी गेली वाहून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामावर नागरिकांचा सवाल
भिवंडी – भिवंडी तालुक्यातील पडघा
-सापे वाशेरे आमणे – बापगाव मार्गे कल्याण कडे जाणाऱ्या प्रमुख रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली असून संपूर्ण रस्ता मोठमोठ्या खड्ड्यांनी व्यापला आहे. पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहनचालकांना खड्यांचा अंदाज येत नसून दररोज अपघाताचा धोका वाढत आहे. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याने प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
या रस्त्यावर पडघा, सापे, वाशेरे, आमणे आणि बापगाव परिसरात अनेक औद्योगिक कंपन्या, गोदामे व लॉजिस्टिक पार्क असल्याने दिवस – रात्र ट्रक, कंटेनर आणि इतर अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. मात्र रस्त्यावरील खड्यांमुळे ही वाहने वारंवार अडकत असून वाहतूक संथ होत आहे. अनेक वेळा वाहनांच्या रांगा लागून वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याने कामगार, कर्मचारी आणि नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर वेळ वाया जात आहे. विशेष म्हणजे, सुमारे दहा दिवसांपूर्वी भिवंडी सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावर खडी टाकून मलमपट्टी केली होती. मात्र सततच्या पावसात ही खडी पूर्णपणे वाहून गेली असून रस्त्याची स्थिती पुन्हा ‘जैसे थे’ झाली आहे. त्यामुळे संबंधित विभागाने केवळ तात्पुरती मलमपट्टी करून नागरिकांची दिशाभूल केल्याचा आरोप स्थानिक
नागरिकांकडून केला जात आहे. लाखो रुपयांचा खर्च करूनही कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. रस्त्यावरील खड्यांमुळे दुचाकीस्वारांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. पाण्याने भरलेल्या खड्यांमुळे वाहन घसरून किरकोळ अपघातांच्या घटना सातत्याने घडत आहेत. रात्रीच्या वेळी रस्त्यावर पुरेसा प्रकाश नसल्याने अपघाताचा धोका आणखी वाढतो, विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयात पोहोचण्यासाठी, रुग्णवाहिकांना रुग्णांना वेळेत दवाखान्यात नेण्यासाठी तसेच शेतकरी व व्यापाऱ्यांना मालाची वाहतूक करण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून या रस्त्याचे तातडीने दर्जेदार डांबरीकरण करून कायमस्वरूपी दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने आणि काही दिवसांपूर्वी करण्यात आलेली खडीची मलमपट्टी अवघ्या दहा दिवसांत वाहून गेल्याने भिवंडी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यामुळे प्रशासनाच्या पावसाळापूर्व नियोजनाचा पूर्णपणे फज्जा उडाल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.


