माझा कार्यकर्ता आज वकील झाला, याचा मला अभिमान आहे-आमदार किसन कथोरे

मुरबाड विधानसभा मतदारसंघातील ज्येष्ठ, निष्ठावंत आणि सामाजिक कार्यात सातत्याने सक्रिय असलेले कार्यकर्ते अॅड. आण्णा मोतीराम साळवे यांनी एलएलबी पदवी यशस्वीरीत्या संपादन करून विधी क्षेत्रात प्रवेश
केला आहे. त्यांच्या या यशाबद्दल आमदार किसनजी कथोरे यांनी विशेष आनंद व्यक्त करत, ‘माझा कार्यकर्ता
आज वकील झाला, याचा मला मनापासून अभिमान आहे,’ अशा भावनिक शब्दांत त्यांचे कौतुक केले. अॅड. आण्णा साळवे यांनी आपल्या यशामागे आमदार किसन कथोरे यांचे मोलाचे मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि सहकार्य असल्याचे सांगितले. त्यांनी सांगितले की, मुरबाड विधानसभा मतदारसंघात कार्यरत असताना आमदार कथोरे यांनी त्यांच्यावर भाजपा अनुसूचित जाती मोर्चा तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली होती. ही जबाबदारी त्यांनी निष्ठा, प्रामाणिकपणा आणि समर्पणाने पार पाडली.

यानंतर कायद्याचे शिक्षण घेण्याची इच्छा त्यांनी आमदार कथोरे यांच्यासमोर व्यक्त केली. त्यावेळी आमदारांनी संस्थेचे अध्यक्ष रवींद्र घोडविंदे यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या प्रवेशासाठी आवश्यक सहकार्य केले. या पाठबळामुळे अॅड. साळवे यांनी तीन वर्षांचा एलएलबी अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण करून चांगल्या गुणांसह पदवी संपादन केली.

यावेळी अॅड. आण्णा मोतीराम साळवे म्हणाले, ‘आमदार किसनजी कथोरे साहेबांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे आणि दिलेल्या संधीमुळेच मी आज वकील होऊ शकलो. माझ्या एलएलबी पदवीचा उपयोग गोरगरीब, शोषित, वंचित आणि पीडित नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी करणार असून, समाजहितासाठी सदैव कार्यरत राहीन.

अॅड. साळवे यांच्या यशाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना आमदार किसनजी कथोरे म्हणाले, ‘माझा एक कार्यकर्ता आज वकील झाला, याचा मला मनापासून अभिमान आहे. अण्णा मोतीराम साळवे यांनी अत्यंत मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर ही पदवी संपादन केली आहे.

Scroll to Top