NQAS ‘प्लॅटिनम’ नामांकनाने ठाणे जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला नवा मान
सार्वजनिक आरोग्य सेवेतील गुणवत्ता, रुग्णसुरक्षा आणि विश्वासार्ह उपचारांचा नवा आदर्श निर्माण करत ग्रामीण रुग्णालय बदलापूरने राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानके (NQAS) अंतर्गत २१ टक्क्यांहून अधिक गुणांसह ‘प्लॅटिनम’ श्रेणीतील राष्ट्रीय नामांकन मिळविले आहे. महाराष्ट्रातील असे नामांकन मिळवणारे हे तिसरे ग्रामीण रुग्णालय ठरले असून, ठाणे जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेसाठी ही मोठी उपलब्धी मानली जात आहे.
या नामांकनामुळे बदलापूर परिसरातील नागरिकांना अधिक सुरक्षित,दर्जेदार, रुग्णकेंद्रित आणि आधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या रुग्णालयाच्या प्रयत्नांवर राष्ट्रीय स्तरावर शिक्कामोर्तब झाले आहे. स्वच्छता, रुग्णसुरक्षा, संसर्ग नियंत्रण, औषध व्यवस्थापन, नोंदवही, आपत्कालीन सेवा आणि रुग्णाभिमुख सुविधा अशा विविध निकषांवर रुग्णालयाने उत्कृष्ट कामगिरी केली. या यशामागे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ कैलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि निवासी वैद्यकीय अधिकारी (Outreach) डॉ. मृणाली राहूड वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्योत्स्ना सावंत यांच्या नेतृत्वाखाली रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, पॅरामेडिकल कर्मचारी आणि सर्व कर्मचाऱ्यांचे संघभावनेने केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न महत्त्वाचे ठरले. तसेच जिल्हा गुणवत्ता आश्वासन पथकाने गुणवत्ता सुधारणा प्रक्रियेत प्रभावी मार्गदर्शन केले.


