भिवंडी- भिवंडी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका पडद्या परिसरालाही बसला आहे. पडघा येथील शास्त्रीनगर परिसरातील अंगणवाडी क्रमांक २ वर बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास भलेमोठे झाड कोसळल्याने अंगणवाडीचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने घटना रात्री घडल्याने आणि अंगणवाडी बंद असल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे अंगणवाडीलगत उभे असलेले मोठे झाड उन्मळून थेट अंगणवाडीच्या इमारतीवर कोसळले. झाडाचा मोठा भाग छतावर पडल्याने छतावरील १२ पत्रे फुटले असून इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे रात्रीभर पावसाचे पाणी अंगणवाडीत शिरून कार्यालयीन साहित्य, फर्निचर, शैक्षणिक साहित्य तसेच इतर आवश्यक वस्तूंचीही हानी झाली.
घटनेची माहिती मिळताच पडघा ग्रामपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. प्रशासनाला याबाबत माहिती देण्यात आली असून झाड हटविण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहे. स्थानिक नागरिकांनीही मदतकार्यात सक्रिय सहभाग घेत परिसरातील परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. घटना मध्यरात्री घडल्याने अंगणवाडीत विद्यार्थी किवा कर्मचारी उपस्थित नव्हते. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. मात्र इमारतीची अवस्था पाहता ती सध्या वापरण्यास अयोग्य ठरली असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीन अंगणवाडी तात्पुरत्या स्वरूपान दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागणार आहे. या घटनेनंत स्थानिक नागरिकांनी नुकसानग्रस्त अंगणवाडीची तातडीने दुरुस्ती करावी, लहान मुलांसाठी सुरक्षित पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी तसेच परिसरातील धोकादायक व जीर्ण झाडांचे सर्वेक्षण करून आवश्यक त्या झाडांची छाटणी अथव हटविण्याची मोहीम हाती घ्यावी अशी जोरदार मागणी केली आहे


