५० कोटी रुपयांच्या प्रकल्पाला प्रत्यक्ष सुरुवात
कळव्यात उभारण्यात येणारा आंतरराष्ट्रीय दर्जाचा तरण तलाव आणि अत्याधुनिक बहुउद्देशीय क्रीडा संकुल हे केवळ कळव्याच्याच नव्हे, तर संपूर्ण ठाणे जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे. या ठिकाणी उपलब्ध होणाऱ्या आधुनिक आणि दर्जेदार सुविधांमुळे होतकरू खेळाडूंना आपल्या परिसरातच प्रशिक्षण आणि
सरावासाठी उत्तम व्यासपीठ उपलब्ध होईल. भविष्यात हजारो खेळाडू या क्रीडा संकुलात प्रशिक्षण घेतील, आपली गुणवत्ता सिद्ध करतील आणि त्यातून राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकणारे खेळाडू घडतील. हे खेळाडू आपल्या शहरासह ठाणे जिल्ह्याचे आणि महाराष्ट्राचे नाव मोठे करतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने कळवा येथील यशवंत रामा साळवी तरण तलावाच्या पुनर्विकासासह उभारण्यात येणाऱ्या बहुउद्देशीय क्रीडा संकुलाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून कळवा येथील यशवंत रामा साळवी तरण तलावाच्या पुनर्विकासासह बहुउद्देशीय क्रीडा संकुलाच्या उभारणीच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न झाले.


