महाराष्ट्राच्या मातीने देशाला असंख्य मल्ल दिले; मात्र गरिबीमुळे अनेक गुणी पैलवानांची स्वप्ने आखाड्याबाहेरच थांबली. हीच परंपरा मोडून काढण्याचा निर्धार करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त युनायटेड रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (यूडब्ल्यूएफ आय) आणि देवाभाऊ केसरी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ‘पैलवान दत्तक योजना २०२६-२७’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ राज्याचे आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते मलबार हिल येथील सेवा सदन बंगल्यावर करण्यात आला.
या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील ११ होतकरू पैलवानांना दत्तक घेत त्यांना शिष्यवृत्ती, मानधन आणि क्रीडा साहित्याचे वितरण करण्यात आले. महाराष्ट्राच्या कुस्तीला नवे बळ देणाऱ्या या उपक्रमामुळे आर्थिक अडचणींमुळे मागे पडणाऱ्या प्रतिभावान मल्लांच्या स्वप्नांना आता भक्कम आधार मिळणार आहे.
या योजनेत सोहम सुनील कुंभार, ज्ञानवी अर्जुन पाटील, संग्राम नितीन खुर्द, रणवीर समिंदर जाधव, श्रीकर भास्कर नायकवडी, वैष्णवी शंकर पाटील, वीरेन अरुण पाटील, हर्षल आनंद घाटके, विश्वजीत धर्मेंद्र सावंत, पियुष दादासो शेवाळे आणि व्यंकटेश चोरगे या ११ होतकरू पैलवानांची निवड करण्यात आली. आर्थिक आधारासह दर्जेदार प्रशिक्षणासाठी हा उपक्रम त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
मार्गदर्शन करताना गिरीशभाऊ महाजन म्हणाले, “महाराष्ट्राला कुस्तीची समृद्ध परंपरा लाभली आहे. मात्र ग्रामीण भागातील अनेक गुणवंत खेळाडू आर्थिक अडचणींमुळे मोठ्या संधींपासून दूर राहतात. ‘पैलवान दत्तक योजना’ ही केवळ आर्थिक मदतीची योजना नसून युवा पैलवानांच्या स्वप्नांना बळ देणारी सामाजिक चळवळ आहे. उद्योग क्षेत्र, सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने भविष्यात ५० पैलवान दत्तक घेण्याचा आमचा मानस आहे. निवड झालेल्या पैलवानांनी शिस्त, कठोर परिश्रम आणि सातत्याच्या जोरावर महाराष्ट्रासह देशाचे नाव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल करावे.”
कार्यक्रमाला कुस्ती क्षेत्रातील मान्यवर, प्रशिक्षक, पालक, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, क्रीडाप्रेमी तसेच मोठ्या संख्येने युवा पैलवान उपस्थित होते. उपस्थितांनी पैलवान दत्तक योजना’ हा उपक्रम महाराष्ट्राच्या कुस्ती चळवळीला नवी दिशा देणारा आणि गरिबीतून झुंजणाऱ्या प्रतिभावान मल्लांच्या आयुष्याला नवी ताकद देणारा ऐतिहासिक टप्पा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.


