सिडकोच्या मूळ नियोजनात कोपरखैरणे, बोनको डेतून एपीएमसी – तुर्भेकडे जाण्यासाठी रस्ता नव्हता मात्र हा पूल झाल्याने नागरिकांचा मोठा वळसा वाचणार आहे व त्यांचा फायदा होईल याबद्दल समाधान व्यक्त करीत महाराष्ट्र राष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी रेल्वे रूळांना समांतर रस्ता झाल्यास ते अधिक सुविधाजनक होईल, त्यादृष्टीने संबंधित प्राधिकरणांशी चर्चा करू अशा शब्दात मनोगत व्यक्त केले.
कोपरखैरणे येथून एपीएमसी मार्केटला जाण्यासाठी सोयीचे व्हावे यादृष्टीने सेक्टर ११ कोपरखैरणे ते पावणेश्वर उड्डाणपूलास जोडणाऱ्या रस्त्यावरील पूलाचे लोकार्पण महाराष्ट्र राज्याचे वन मंत्री ना. गणेश नाईक यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी महापौर सुजाता पाटील, उपमहापौर दशरथ भगत, सभागृह नेते सागर नाईक, स्थानिक नगरसेवक मुनावर पटेल, वैष्णवी नाईक, अदिती नाईक, स्विकृत नगरसेवक अमित मेढकर, माजी नगरसेवक लिलाधर नाईक आणि प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोपरखैरणे विभागातून एपीएमसी मार्केटकडे जायचे असल्यास मोठा वळसा घालून जावे लागते. तथापि पावणेश्वर उड्डाणपुलाखालील रस्ता आणि सेक्टर ११ कोपरखैरणे येथील रस्ता यामधील मोठ्या नाल्यावर ४१ मी. लांबीचा आणि ७.५० मी. रुंदीचा हा पूल बनविण्यात आल्याने नागरिकांची इंधन बचत होणार आहे तसेच वेळेचीही बचत होणार आहे. या पूलामुळे प्रामुख्याने कोपरखैरणे सेक्टर ११, खैरणेगाव आणि बोनकोडेगाव येथील नागरिकांना एपीएमसी मार्केटकडे जाण्यासाठी हा सुलभ मार्ग आहे.


