पडघ्यात टी.ए. पाटील शाळेतील रस्त्यात कोसळले झाड

भिवंडी – सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भिवंडी तालुक्यातील पडघा येथील टी.ए. पाटील इंग्रजी शाळेजवळ दुपारी सुमारे १२.३० वाजण्याच्या दरम्यान भलेमोठे जीर्ण झाड कोसळले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या आठवड्यात पडघ्यात झाड कोसळण्याची ही दूसरी घटना असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जोरदार वाऱ्यासह सुरू असलेल्या पावसामुळे टी.ए. पाटील इंग्रजी शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यालगतचे एक जीर्ण झाड अचानक कोसळले. त्यावेळी सकाळच्या सत्रातील शाळा नुकतीच सुटली होती, तर दुपारच्या सत्रातील विद्यार्थी शाळेत येत होते. विद्यार्थी आणि पालक यांची या रस्त्यावर मोठी वर्दळ असतानाच ही घटना घडली. विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यासाठी आलेल्या काही शालेय व्हॅनही काही काळ अडकून पडल्या. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा मोठी दुर्घटना घडली नाही. घटनेची माहिती मिळताच पडघा ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच संबंधित प्रशासनालाही याची माहिती देण्यात आली असून, झाड हटविण्याची कार्यवाही हाती घेण्यात येणार आहे.

Scroll to Top