ठाण्याला नवीन अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयासह दोन तहसील कार्यालय होणार

ठाणेकरांच्या मालमत्ता आणि हक्क सुरक्षेसाठी शासन कटिबद्ध – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिराच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातील तब्बल ७६ हजार कुटुंबांना शासकीय योजनांचा थेट लाभ देण्यात यश आले असून, हे अभियान लोकाभिमुख आणि गतिमान कारभाराचे उत्तम उदाहरण ठरले आहे, असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे केले.

त्याबरोबरच ठाण्याला नवीन अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय आणि दोन नवीन तहसील कार्यालय देखील होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महोदयांचा जन्मदिवस आणि माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित दादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून आणि ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या पुढाकारातून ठाण्यातील गडकरी रंगायतन समोरील शिवसमर्थ विद्यालयात आज आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार संजय केळकर, आमदार मंदाताई म्हात्रे, आमदार निरंजन डावखरे, आमदार विक्रांत पाटील, आमदार माधवी नाईक, आमदार रविंद्र फाटक, आमदार किसन कथोरे, आमदार कुमार आयलानी, ठाणे महानगरपालिकेचे उपमहापौर कृष्णा पाटील, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रणजीत यादव, अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदिप माने यांच्यासह सर्व उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसिलदार, अॅड. संदीप लेले यांच्यासह विविध विभागाचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने नागरीक उपस्थित होते.

Scroll to Top