नोकरीचे आमिष दाखवत ७० लाख रुपयांची फसवणूक करणारी टोळी जेरबंद

महसूल व वन विभागात नोकरी लावून देण्याचे आमिषदेत तब्बल ७० लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा भिवंडी गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे.

या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, आरोपींकडून मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षया, शिक्के आणि बनावट नियुक्तीपत्रांचा वापर केल्याचे तपासात समोर आले आहे. आरोपींविरुद्ध यापूर्वीही महाराष्ट्रातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये अनेक फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस उपायुक्त गुन्हें अमरसिंह जाधव यांनी दिली. तक्रारदार दर्शन पाटील, राहणार काल्हेर, भिवंडी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, इसान उर्फ शाम विठोबा खटकर याने महसूल व वन विभागात सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले, विश्वास संपादन करण्यासाठी मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाने बनावट शासकीय पत्रे, स्वाक्षऱ्या व शिक्के तयार करून तक्रारदाराकडून ऑनलाइन, बँक व्यवहार आणि रोख स्वरूपात एकूण ७० लाख रुपये उकळण्यात आले. फसवणुकीनंतर तक्रारदाराच्या नावाने बनावट नियुक्तीपत्र तसेच ओळखपत्र देण्यात आले. तक्रारदार संबंधित विभागात नियुक्ती पत्र घेऊन गेले असता त्यांना हे नियुक्ती पत्र बनावट असल्याचे समजले. आपली फसवणूक झाल्याचे समजल्यावर त्याने नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

त्यानंतर हा तपास भिवंडी गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला.

Scroll to Top