स्वयम संस्थेच्या २० व्या वर्धापन दिनी दिव्यांगांसाठी फिरत्या वैद्यकीय सुविधा केंद्राचा शुभारंभ

गेली २० वर्षे ठाणे व परिसरातील दिव्यांग व्यक्ती, बहुविकलांग मुले आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या पुनर्वसनासाठी कार्यरत असलेल्या स्वयम – बहुविकलांग मुलांचे पुनर्वसन केंद्र या संस्थेने आपल्या समाजसेवेतील सेवेचा एक महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण केला आहे. या २० वर्षांच्या कार्याचा पुढचा टप्पा म्हणून संस्थेने आता संपूर्ण महाराष्ट्रातील ‘दिव्यांगांसाठी फिरते वैद्यकीय सुविधा केंद्र’ हा अभिनव उपक्रम सुरू केला असून गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या उपक्रमाचे लोकार्पण करण्यात आले.

स्वयम संस्थेमार्फत दिव्यांग व्यक्तींना वैद्यकीय उपचार, फिजिओथेरपी, विशेष शिक्षण, समुपदेशन, सहाय्यक उपकरणांचे वितरण, गृहस्थित उपचारांचे मार्गदर्शन तसेच पालकांसाठी प्रशिक्षण अशा विविध सेवा सातत्याने उपलब्ध करून दिल्या जातात. गेल्या दोन दशकांत हजारो दिव्यांग व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबीयांचा शारीरिक, मानसिक, सामाजिक व आर्थिक ताण कमी करण्यासाठी संस्थेने सातत्याने प्रयत्न केले आहेत.

महाराष्ट्रातील ग्रामीण आणि दुर्गम भागात राहणाऱ्या अनेक दिव्यांग व्यक्तींना उपचार, प्रमाणपत्रे, सरकारी सुविधा आणि पुनर्वसन सेवा मिळविण्यासाठी वारंवार शहरात यावे लागते. दिव्यांग व्यक्तीच्या कुटुंबियांसाठी हा प्रवास शारीरिकदृष्ट्या कठीण तर आर्थिकदृष्ट्याही परवडणारा नसतो. विशेषतः मोठ्या वयाच्या दिव्यांग व्यक्तींना सार्वजनिक वाहतुकीने उपचार केंद्रात ने-आण करणे अनेक पालकांसाठी अशक्य होते. याच समस्येवर उपाय म्हणून स्वयम संस्थेने ‘दिव्यांगांसाठी फिरते वैद्यकीय सुविधा केंद्र’ ही संकल्पना विकसित केली आहे. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश महाराष्ट्रातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या गावाजवळच आवश्यक वैद्यकीय, पुनर्वसन आणि मार्गदर्शनाच्या सेवा उपलब्ध करून देणे तसेच त्यांच्या कुटुंबीयांचा मनोसामाजिक आणि आर्थिक ताण कमी करणे, आणि फिरत्या सुविधा केंद्राद्वारे वेगवेगळ्या सेवा उपलब्ध करून देण्याचा एक प्रयत्न आहे.

Scroll to Top