ठाणे – ऐरोली – काटई उन्नत मार्ग प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना २५ टक्के वाढीव मोबदला देण्याची मागणी भाजपा नगरसेविका वेदिका पाटील यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावकुळे यांच्याकडे केली. ठाणे विधानसभा मतदारसंघात आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान’ कार्यक्रमात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भाजपा नगरसेविका वेदिका पाटील यांनी भेट घेत प्रभागातील मौजे देसाई येथील ऐरोली-काटई उन्नत मार्ग प्रकल्पग्रस्त शेतकरी व जमीनधारकांच्या न्याय्य हक्कांसाठी सविस्तर लेखी निवेदन सादर केले. या निवेदनामध्ये प्रकल्पग्रस्त शेतकरी व भूमिपुत्रांना बुलेट ट्रेन प्रकल्पाप्रमाणे न्याय्य भरपाई, २५ टक्के वाढीव मोबदला, तसेच Multiplier Factor 2 लागू करून योग्य नुकसानभरपाई देण्याची ठाम मागणी केली. शेतकरी आणि भूमिपुत्रांच्या हक्कांशी कोणतीही तडजोड होऊ देणार नाही. त्यांच्या न्याय मोबदल्यासाठी माझा पाठपुरावा यापुढेही सातत्याने सुरू राहील.
यावेळी आमदार संजय केळकर, आमदार किसन कथोरे, विधान परिषद सदस्य निरंजन डावखरे, विधान परिषद सदस्या माधवीताई नाईक, विधान परिषद सदस्य विक्रांत पाटील, भाजपा ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप लेले, उपमहापौर कृष्णा पाटील तसेच विविध शासकीय अधिकारी उपस्थित होते.


