आगरी सेनेचा ४० वा वर्धापन दिन सोहळा संपन्न

दिवंगत लोकनेते राजाराम साळवी यांनी स्थापन केलेल्या आगरी सेनेचा ४० वा वर्धापन दिन सोहळा ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे अभूतपूर्व उत्साहात व जल्लोषात पार पडला. राज्यभरातून तसेच मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातून हजारो कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावत आगरी सेनेच्या एकजुटीचे दर्शन घडविले. ‘आगरी सेना जिंदाबाद’च्या घोषणांनी गडकरी रंगायतन परिसरासह संपूर्ण ठाणे शहर दणाणून गेले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आगरी सेनेचे प्रमुख प्रदीप साळवी होते. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा), खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर आणि आमदार सुलभा गायकवाड उपस्थित होते. महिला आघाडी प्रमुख मनिषा पाटील, युवा आगरी सेना प्रमुख राहुल साळवी, मध्यवर्ती समितीचे पदाधिकारी, जिल्हाप्रमुख तसेच विविध आघाड्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सनईच्या मंगल स्वरांत, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि पारंपरिक स्वागताने झाली. दिवंगत राजाराम साळवी यांच्या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाद्वारे साकारलेल्या आवाजातील आगरी सेनेच्या ४० वर्षांच्या वाटचालीवरील माहितीपटाने उपस्थितांना भावूक केले. त्यानंतर सर्वांनी उभे राहून दिवंगत राजारामजी साळवी यांना श्रद्धांजली अर्पण केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास तसेच लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी दिवंगत राजाराम साळवी यांच्या तैलचित्राचे व पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमात उपस्थितांना आगरी सेनेची प्रतिज्ञाही देण्यात आली. यावेळी बोलताना खासदार सुरेश म्हात्रे यांनी आगरी समाजाच्या प्रत्येक न्याय्य लढ्यात आपण प्रदीप साळवी यांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहू, अशी ग्वाही दिली. खासदार नरेश म्हस्के यांनीही मार्गदर्शन केले. आमदार संजय केळकर यांनी भूमिपुत्रांच्या प्रश्नांसाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले, तर आमदार सुलभा गायकवाड यांनी आगरी समाजाच्या प्रश्नांसाठी आगरी सेना ही प्रभावी संघटना असल्याचे सांगून कायम सोबत राहण्याचे आश्वासन दिले.

Scroll to Top