सध्याची वातावरणाची स्थिती पाहता पर्यावरण संरक्षण व संवर्धनाला पर्याय नाही हे लक्षात घेत योग्य प्रकारे झाडे लावणे आणि त्यांचे संवर्धन करणे ही आपली प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे सांगत नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांनी नागरिकांना यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी ‘हरित प्रभाग’ अर्थात ‘ग्रीन वॉर्ड’ स्पर्धा राबविण्याची संकल्पना जाहीर केली. या पर्यावरणपूरक वृक्षारोपण संवर्धन अभियानात सर्व प्रकारच्या संस्था, मंडळे, नागरिक यांनी आपले भविष्य सुरक्षित करण्यासाठी स्वयंस्फुर्तीन सहभागी व्हावे असेही आवाहन महापौरांनी केले. नवी मुंबई महानगरपालिका उद्यान विभागाच्या वतीने सेक्टर १४ कोपरखैरणे येथील निसर्गोद्यानामध्ये ‘माझी वसुंधरा अभियान ७.०’ अंतर्गत ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमाच्या अनुषंगाने आयोजित वृक्षारोपण समारंभप्रसंगी त्या उपस्थितांशी संवाद साधत होत्या. यावेळी महापौर सुजाता पाटील, आयुक्त डॉ. कैलास शिंदे, प्रभागसमिती अध्यक्ष चंद्रभागा मोरे, आरोग्य समिती सभापती डॉ. जयाजी नाथ, पाणीपुरवठा समिती सभापती रविकांत पाटील, विधी समिती सभापती अॅड. सायली शिंदे, नगरसेवक संदीप म्हात्रे, डी. आर. पाटील, नगरसेविका अॅड. भारती पाटील, दिक्षा कचरे, मिनाक्षी पाटील आणि उद्यान विभागाच्या उपआयुक्त स्मिता काळे, कोपरखैरणे विभागाचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी भरत धांडे, सहा. उद्यान अधिकारी भालचंद्र गवळी, उद्यान अधिक्षक विजय कांबळे, उद्यान सहाय्यक श्रीकांत जाधव तसेच मोठ्या संख्येने उपस्थित विविध संस्थांचे पदाधिकारी, शाळा महाविद्यालयांचे -मुख्याध्यापक – शिक्षक – विद्यार्थी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी पर्यावरणाचा हास रोखण्यासाठी सर्वांनी मिळून जागरूकतेने प्रयत्न करण्याची गरज विषद करीत ही आपल्या अस्तित्वाची लढाई असल्याचे सांगितले. विकास हा पर्यावरणाची काळजी घेऊनच व्हायला हवा हे स्पष्ट करीत नवी मुंबई क्षेत्रात होणारी वृक्षलागवड ही जैवविविधतेला नजरेसमोर ठेवून प्राधान्याने देशी प्रजातीच्या झाडांचीच होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केलेय नवी मुंबई महापालिकेस पर्यावरण विषयक कामात सहकार्य करणाऱ्या संस्थांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते शाल.


