भिवंडीत ‘नशा मुक्त युवा भारत’ अभियानांतर्गत जनजागृती रॅली

अंमली पदार्थांच्या सेवनापासून तरुणाईला दूर ठेवण्या साठी ‘नशा मुक्त युवा भारत’ अभियानांतर्गत भिवंडीत शनिवारी जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

समदिया हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज आणि भिवंडी शहर पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. समदनगर येथील समदिया हायस्कूलपासून रॅलीला सुरुवात झाली. त्यानंतर हुद्दा मस्जिद, समदनगर गेट क्रमांक २, कणेरी चौकी, समदनगर गेट क्रमांक १ या मार्गाने रॅली काढण्यात आली. अखेर समदिया हायस्कूल येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. या जनजागृती रॅलीमध्ये सुमारे १२५ विद्यार्थी विद्यार्थिनी, शिक्षक तसेच भिवंडी शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी अंमली पदार्थांच्या सेवनाचे दुष्परिणाम तसेच नशे पासून दूर राहण्याचा संदेश देत नागरिकांमध्ये जनजागृती केली.

Scroll to Top