जाफरभाई शेख समाजासाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व – आमदार किसन कथोरे

मुरबाड तालुक्यातील उद्योजक, समाजसेवक आणि सर्व धर्मीयांमध्ये आपुलकीचे नाते जपणारे जाफरभाई कादिर शेख हे आपल्या सामाजिक कार्यातून समाजासमोर आदर्श निर्माण करत आहेत. गरजवंतांना मदतीचा हात देण्याबरोबरच गरीब कुटुंबातील मुलींच्या विवाहासाठी वेळोवेळी सहकार्य करणारे जाफरभाई शेख हे हज यात्रेसाठी रवाना होत आहेत. त्यानिमित्त त्यांचे जिवलग मित्र आमदार किसन कथोरे यांनी त्यांची भेट घेऊन पवित्र हज यात्रेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

यावेळी आमदार किसन कथोरे म्हणाले की, ‘जाफरभाई शेख यांनी शून्यातून विश्व निर्माण केले आहे. गेल्या पन्नास वर्षांपासून आमची मैत्री कायम असून, सुख-दुःखात एकमेकांच्या पाठीशी उभे राहण्याचे आमचे नाते आजही तितकेच दृढ आहे. सर्व धर्मातील लोकांना एकत्र घेऊन समाजहिताचे काम करणारे जाफरभाई हे मुरबाडच्या सामाजिक जीवनातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व आहेत.!

या कार्यक्रमाला मुरबाड तालुका भाजपा अध्यक्ष दीपक पवार, मुरबाड शहराचे माजी नगराध्यक्ष मोहन सासे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुरेश बांगर, आरपीआय तालुका अध्यक्ष दिनेश उघडे यांच्यासह तालुक्यातील विविध समाजघटकांतील नागरिक व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Scroll to Top