मुंबई महानगर प्रदेशात ५० पेक्षा अधिक ठिकाणी मुक्ती पर्व समारोह संपन्न

संपूर्ण भारतवर्षात राष्ट्रभक्ती, अभिमान आणि उत्साहाने स्वातंत्र्यदिन साजरा करीत असतानाच संत निरंकारी मिशनच्या वतीने या ऐतिहासिक दिनाचे औचित्य साधून ब्रह्मज्ञानातून प्राप्त होणाऱ्या अंतर्मनाच्या स्वातंत्र्याचा दिव्य संदेश जनमानसापर्यंत पोहोचवण्यात आला. बाह्य बंधनांतून मुक्त होणे म्हणजेच खरी मुक्ती नव्हे; अज्ञान, अहंकार आणि भेदभाव यांपासून मुक्त होऊन आत्मबोध आणि परमात्मबोधाची अनुभूती घेणे, यातच खरी मुक्ती सामावलेली आहे, हा संदेश या पर्वातून अधोरेखित करण्यात आला.

मुंबई महानगर प्रदेशात कुलाबा ते विरार, मुंबई ते ठाणे, नवी मुंबई, पनवेल, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, बदलापुर, भिवंडी तसेच उरण आदि परिसरातील ५० हून अधिक ठिकाणी मुक्ती पर्व समारोहांचे आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये मोठ्या संख्येने स्थानिक भाविक भक्तगणांनी भाग घेतला.

मुक्ती पर्वाचा हा समागम, सत्गुरू माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमितजी यांच्या सान्निध्यात दिल्ली येथील निरंकारी सरोवरा समोरील ग्राउंड क्रमांक २, निरंकारी चौक, बुराडी रोड येथे श्रद्धा, भक्ती आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

विदेशातील व्यापक कल्याणकारी प्रचार यात्रेच्या यशस्वी समारोपानंतर, दीर्घ कालावधीनंतर सद्गुरूंचे पावन दर्शन लाभल्याने दिल्ली-एनसीआरसह देशाच्या विविध भागांतून आलेले हजारो श्रद्धाळू भक्त भावविभोर झाले.

Scroll to Top