श्रावण महिन्यातील सण-उत्सव आणि समृद्ध खाद्यसंस्कृतीचा वारसा जपण्यासाठी दरवर्षी आयोजित केला जाणारा बहुप्रतिक्षित ‘श्रावण महोत्सव’ यंदा आपल्या १२ व्या वर्षात पदार्पण करत आहे. मिती क्रिएशन व चैत्र गौरी महिला मंडळ यांच्या सहकार्याने आणि उत्तरा मोने प्रस्तुत ‘श्रावण महोत्सव २०२६’ पाककला स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा सोहळा मंगळवार, १८ ऑगस्ट २०२६ रोजी ठाण्यातील पाचपाखाडी येथील ज्ञानराज सभागृह येथे पार पडला. माजी नगरसेविका सौ. नंदिनी विचारे यांच्या विशेष पुढाकाराने व आयोजनाने हा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या स्पर्धेमध्ये ठाण्यातील महिला आणि पुरुषांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदवत आपल्या पाककलेचे उत्तम सादरीकरण केले. या प्राथमिक फेरीतून ५ गुणवंत स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे.
मान्यवरांची उपस्थिती या सोहळ्याला शिवसेना नेते व माजी खासदार राजन विचारे, माजी नगरसेविका नंदिनी विचारे, महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर, महिला उपजिल्हा संघटक आकांक्षा राणे, शहर संघटिका प्रमिलाताई भांगे, अनुजा पिंजारी, उपशहर संघटिका रेखा पाटील, वर्षा पाटील, कविता नार्वेकर, अपूर्वा तेलवणे, मेघा विचारे, अश्विनी कानोलकर आणि ऋतुजा शिंत्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच कार्यक्रमाच्या सादरकर्त्या उत्तरा मोने यांच्यासह परीक्षक म्हणून आकांक्षा ताम्हाणे, ऋचा मेहेंदळे, ऋता आजगावकर,स्वाती कुलकर्णी, भाग्यश्री लेले, आरती निजापकार, नंदिनी बिवलकर, श्रीरंग भावे, अनिश देशमुख, यश पाटील आणि कल्याणी काळे यांनी परीक्षण केले.
तसेच या प्राथमिक फेरीमध्ये ठाण्यातून अंजली लेले, योगिता फापाळे, मोहिनी घरत, स्मिता पाटील, विना प्रभू या स्पर्धेत विजयी झालेल्या ५ स्पर्धकांची निवड अंतिम फेरीसाठी करण्यात आली आहे. पुढील फेऱ्या पालघर, पुणे, गोरेगाव, मालाड, मुंबई, नाशिक, पनवेल, डोंबिवली आणि वसई याठिकाणी सर्व प्राथमिक फेऱ्या पार पडणार आहेत.
प्रत्येक भागातून ५-५ स्पर्धकांची निवड केली जाणार असून, अखेर सर्व फेऱ्यांतून निवडलेल्या एकूण ५० स्पर्धकांमध्ये महाअंतिम फेरी रंगणार आहे. ठाण्यातून मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल ‘मिती क्रिएशन्स’च्या वतीने माजी नगरसेविका नंदिनी विचारे यांचे विशेष आभार मानण्यात आले.


