तालुक्यातील ग्रामपंचायत सोनाळे हद्दीतील मौजे घोळगाव येथील मुंबई – नाशिक महामार्ग ते गुरुदेव कंपाऊंड परिसरातील रस्ता अत्यंत खराब झाला असून, या रस्त्याचे तातडीने काँक्रिटीकरण करण्यात यावे, अशी मागणी ग्रामपंचायत सोनाळे प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.
पावसामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालक व नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या मार्गावर वारंवार अपघात होत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे रस्त्याचे काम तातडीने हाती घेऊन नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम अभियंता दत्तु गिते यांच्या कडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी सरपंच रुपाली जितेंद्र मानेरकर, उपसरपंच रवि गुळवी, माजी उपसरपंच तथा सदस्य संजय थळे, देवा ग्रुप फाऊंडेशनचे सचिव तानाजी मोरे, समाजसेवक जितेंद्र मानेरकर व ग्रामविकास अधिकारी काशिनाथ माळी उपस्थित होते.
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता दत्तु गिते यांनी ग्रामपंचायतीच्या निवेदनाची दखल घेत, येत्या दोन महिन्यांत प्रशासकीय मान्यता घेऊन रस्त्याचे काम सुरू करण्यात येईल, असे आश्वासन ग्रामपंचायत प्रशासनाला दिले आहे.


