ज्यांना समाजाने ‘मनोरुग्ण’ म्हटले त्यांनी जवानांना बांधला देशप्रेमाचा धागा !

रक्षाबंधन म्हणजे भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेमाचा धागा. मात्र, याच धाग्याला देशसेवेची भावना जोडली की त्याला वेगळेच मोल प्राप्त होते. ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयातील महिलांनी स्वतःच्या हाताने तयार केलेल्या ५०० राख्या सीमेवरील जवानांसाठी पाठवून देशरक्षण करणाऱ्या जवानांप्रती आपली कृतज्ञता आणि आपुलकी व्यक्त केली.

‘आम्ही शिवभक्त परिवार’ या संस्थेच्या माध्यमातून हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नेताजी मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांनी उत्साहाने या राख्या तयार केल्या. प्रत्येक राखीत रंगीत धाग्यांसोबतच जवानांप्रती आदर, कृतज्ञता आणि देशप्रेमाची भावना गुंफलेली होती.

रक्षाबंधनाच्या दिवशी प्रत्येक बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधून त्याच्या सुख-समृद्धीची आणि सुरक्षिततेची कामना करते. याच भावनेतून या महिलांनी सीमेवर देशाच्या रक्षणासाठी तैनात असलेल्या जवानांनाही आपला भाऊ मानत त्यांच्या मनगटासाठी राख्या तयार केल्या.

या उपक्रमातून मानसिक आजार असलेल्या व्यक्तींकडे केवळ त्यांच्या आजाराच्या नजरेतून न पाहता, त्यांच्यातील प्रेम, संवेदना, कौशल्य आणि सामाजिक योगदानाची क्षमता ओळखण्याचा संदेश मिळाला आहे. योग्य संधी आणि प्रोत्साहन मिळाल्यास या व्यक्तीही समाजासाठी सकारात्मक योगदान देऊ शकतात, हे या उपक्रमाने अधोरेखित केले.

राख्या तयार करून घेण्यासाठी व्यवसाय उपचार तज्ज्ञ डॉ. जानवी केरडारकर, डॉ. आश्लेषा कोळी यांच्यासह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

‘या महिलांनी तयार केलेल्या राख्यांमधून त्यांची देशाबद्दलची आपुलकी आणि जवानांप्रती कृतज्ञता दिसून येते. मानसिक आजार असलेल्या व्यक्तींमध्येही संवेदना, कौशल्य आणि सामाजिक योगदानाची क्षमता असते, हा संदेश या उपक्रमातून समाजाला मिळतो.

Scroll to Top