पारसिक डोंगर पायथ्याशी वसलेल्या प्रसिद्ध श्री घोलाई देवीला स्थानिक ग्रामस्थ ‘वनदेवता’ स्वरूपात पूजतात. गावकऱ्यांच्या दृष्टीने या संपूर्ण वनक्षेत्राचे धार्मिक व नैसर्गिक पावित्र्य राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पारसिकच्या या डोंगरर परीसराचे रक्षण व्हावे आणि या भूमिचे पावित्र्य जपावे यासाठी ग्रामस्थांनी यापूर्वी एक व्यापक स्वाक्षऱ्यांची मोहीम देखील राबवली होती.
जनभावनेचा आदर राखून, मंदिराच्यामागील वनक्षेत्रात अतिक्रमण होऊ नये म्हणुन वनविभागाने जाळीचे कुंपण घातले आहे. या वर्षी श्रावण मासचे औचित्य साधून विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे वृक्षारोपणासाठी लागणारी वड, पिंपळ, उंबर, जांभूळ यांसारखी सर्व देशी झाडे स्वतः ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन जमा केली होती.
वृक्षारोपणासोबतच संपूर्ण परिसरात व्यापक स्वच्छता मोहीम राबवून प्लास्टिक व कचरा मुक्त परिसर करण्याचा संकल्प यावेळी ग्रामस्थांनी केला. याप्रसंगी कळवा प्रभाग समिती अध्यक्षा विजया लासे, माजी नगरसेवक उमेश पाटील, स्थानिक नगरसेवीका नेमिषा पाटील, नगरसेवक महेश साळवी, भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा हर्षला बुबेरा उपस्थित होत्या. वनविभागाचे परिक्षेत्र वन अधिकारी तुषार साळुंखे आणि वनपाल संतोष आव्हाड हे प्रमुख्याने उपस्थित होते. सर्व उपस्थित मान्यवरांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
प्रसिद्ध गायक किसन फुलोरे यांनी सुश्राव्य निसर्ग गीत सादर केले. शिवसेना विभाग प्रमुख नंदा पाटील, समाजसेवक यशवंत गुळवी, शेतकरी संघटनेचे कृष्णा भगत, खारीगांव भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष आकाश बुबेरा, धनराज पाटील, भानुदास पाटील, रचना पाटील, राकेश पाटील, तसेच युवा साहित्यिक सर्वेश तरे यांची विशेष उपस्थिती होती.


