भाजप नगरसेविका वेदिका पाटील यांचा महासभेत प्रशासनाला सवाल
दिवा प्रभाग समितीतील प्रभाग क्र. २९ मधील खिडकाळी गावातील ठाणे महानगरपालिका मराठी शाळा क्र. ८९ धोकादायक अवस्थेत असतानाही प्रशासनाकडून निकृष्ट दर्जाचे दुरुस्तीचे काम सुरू असल्याचा आरोप भाजप नगरसेविका वेदिका पाटील यांनी केला आहे.
पालकांच्या तक्रारीनंतर पाटील यांनी अधिकाऱ्यांसह शाळेची पाहणी केली होती. यावेळी इमारतीचे प्लास्टर निघालेले, शिड्या तुटलेल्या, स्टीलला गंज लागलेला तसेच कॉलम-बिम चे जॉईंट जीर्ण झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवून शाळेचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे आणि दुरुस्तीऐवजी नवीन इमारत उभारावी, अशी मागणी त्यांनी केली होती. मात्र, लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता प्रशासनाने शाळेच्या दुरुस्तीचे काम सुरू केले असून ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप पाटील यांनी महासभेत केला. या प्रकारामुळे पालकांमध्ये तीव्र नाराजी असून अनेक पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यास तयार नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. ‘ठाणे महापालिका नक्की कोणाची-ठेकेदारांची की विद्यार्थ्यांची?’ असा सवाल करत, शाळेचा कोणताही भाग कोसळून दुर्घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी ठाणे महानगरपालिका प्रशासनाची राहील, असा इशारा नगरसेविका वेदिका पाटील यांनी महासभेत दिला.


