मुरबाड कृषी उत्पन्न बाजार समितीत घाणीचे साम्राज्य; नागरिकांच्या आरोग्याला धोका

मुरबाड तालुक्यातील सर्वात मोठ्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, बाजार समितीच्या आवारात ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरल्याचे चित्र दिसून येत आहे. आठवडी बाजार भरल्यानंतर मोठ्या प्रमाणात निर्माण होणारा पालेभाज्यांचा कचरा वेळेवर उचलला जात नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

शुक्रवारी आठवडी बाजार भरल्यानंतर मोठ्या प्रमाणात पालेभाज्या, भाजीपाला व इतर कचरा बाजार समितीच्या परिसरात जमा झाला. मात्र, मंगळवारपर्यंतही हा कचरा उचलण्यात आलेला नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे कचऱ्याला दुर्गधी येत असून, परिसरात माशा व इतर कीटकांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. बाजार समितीत ये-जा करणारे नागरिक तसेच व्यापारी आणि कामगारांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही बाब चिंताजनक असल्याचे नागरिकांनी सांगितले.

बाजार समितीच्या जवळच शेळके पाडा वस्ती असल्याने या परिसरातील नागरिकांनाही या अस्वच्छतेचा त्रास सहन करावा लागत आहे. कचरा वेळेवर उचलला जात नसल्याने दुर्गंधी आणि अस्वच्छ वातावरणामुळे स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेवर लाखो-कोट्यवधी रुपये खर्च करून विविध इमारती उभारण्यात आल्या आहेत. या ठिकाणी सुमारे ३०० ते ३५० गाळे असून, विविध प्रकारची दुकाने आणि व्यावसायिक व्यवहार सुरू आहेत. मात्र, एवढ्या मोठ्या व्यापारी परिसरात स्वच्छतेची पुरेशी व्यवस्था नसल्याचे चित्र दिसत आहे. विशेषतः स्वच्छतागृहांची अवस्था अत्यंत दयनीय असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. स्वच्छतागृहांची नियमित साफसफाई होत नसल्याने संपूर्ण परिसरात दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Scroll to Top