पदन्यास कथक इन्स्टिट्यूट, बदलापूरच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या ‘नृत्यनाद’ या वार्षिक नृत्यप्रस्तुती कार्यक्रमात यंदा ‘कथक कोलाज’ या संकल्पनेतून कथक नृत्याच्या विविध पैलूंचे मनोहारी सादरीकरण करण्यात आले. संस्थेच्या सुमारे १०० विद्यार्थिनींनी सरगम, चतुरंग, तराणा, कजरी, वंदना, स्तुती आदी वैशिष्ट्यपूर्ण संगीत रचनांवर आधारित नृत्यप्रस्तुती सादर करून रसिकांची दाद मिळवली.
दूरदर्शनच्या मान्यताप्राप्त कलाकार व नृत्यालंकार गुरु गायत्री भट गेल्या दहा वर्षांपासून बदलापूर येथे ‘पदन्यास कथक इन्स्टिट्यूट’च्या माध्यमातून कथक नृत्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देत आहेत. विद्यार्थिनींना कथकच्या तंत्राबरोबरच भारतीय संस्कृती, परंपरा आणि संस्कारांचीही ओळख करून देण्यावर संस्थेचा विशेष भर आहे. पदन्यास कथक इन्स्टिट्यूटच्या अनेक विद्यार्थिनींनी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवले असून काही विद्यार्थिनींना केंद्रीय सांस्कृतिक विभागाच्या (CCRT) शिष्यवृत्तीचाही लाभमिळाला आहे. संस्थेच्या विद्यार्थिनींनी लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्येही आपल्या नावाची नोंद केली आहे. यंदाच्या ‘नृत्यनाद’ कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी गुरु नूतन पटवर्धन होत्या. त्यांनी विद्यार्थिनींना सातत्य, सचोटी
आणि नियमित रियाज यांचा कानमंत्र दिला. प्रत्येक विद्यार्थिनीची क्षमता, कुवत आणि वैशिष्ट्य लक्षात घेऊन गुरु गायत्री भट यांनी त्यांना तयार करून कार्यक्रमात सादर केले, याचेही त्यांनी विशेष कौतुक केले. कार्यक्रमाला नगराध्यक्षा रुचिता घोरपडे आणि सभापती संभाजी शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. बदलापूर शहराची सांस्कृतिक ओळख अधिक समृद्ध करण्यासाठी नगरपालिका कटिबद्ध असून आणि नियमित रियाज यांचा कानमंत्र दिला. प्रत्येक विद्यार्थिनीची क्षमता, कुवत आणि वैशिष्ट्य लक्षात घेऊन गुरु गायत्री भट यांनी त्यांना तयार करून कार्यक्रमात सादर केले, याचेही त्यांनी विशेष कौतुक केले. कार्यक्रमाला नगराध्यक्षा रुचिता घोरपडे आणि सभापती संभाजी शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. बदलापूर शहराची सांस्कृतिक ओळख अधिक समृद्ध करण्यासाठी नगरपालिका कटिबद्ध असून आगामी काळात विविध सांस्कृतिकउपक्रम राबविण्यात येतील, अशी ग्वाही नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांनी दिली.
कार्यक्रमाचे निवेदन प्राध्यापिका भारती जोशी यांनी सहज, ओघवत्या आणि प्रभावी शैलीत केले. संपूर्ण कार्यक्रमात केवळ शास्त्रीय रचनांवर आधारित नृत्यप्रस्तुती, भारतीय संस्कृती आणि संस्कारांचे जतन तसेच विद्यार्थिनींचा शिस्तबद्ध रियाज यांचा सुंदर मिलाफ अनुभवायला मिळाला. त्यामुळे उपस्थित रसिक प्रेक्षक आणि पालकांमध्ये दर्जेदार शास्त्रीय नृत्यप्रस्तुतीचा आनंद आणि समाधान पाहायला मिळाले.
‘कथक कोलाज’च्या माध्यमातून कथकच्या विविध अंगांचे दर्शन घडवत विद्यार्थिनींनी आपल्या कलागुणांना प्रभावीपणे सादर केले. गुरु गायत्री भट यांच्या मार्गदर्शनाखाली साकारलेला हा ‘नृत्यनाद’ कार्यक्रम बदलापूरच्या सांस्कृतिक विश्वात विशेष ठरला.


