मुरबाड तालुक्यातील मौजे शेलारी येथे जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सुरू असलेल्या सुरण लागवड प्रात्यक्षिकाची पाहणी आमदार किसन कथोरे यांनी शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष शेतावर जाऊन केली. यावेळी गजानन भोईर व शांताराम बांगर यांच्या शेतातील सुरण लागवडीची पाहणी करून आमदार कथोरे यांनी पिकाच्या वाढीची व पीक परिस्थितीची माहिती घेतली.
यावेळी तालुका कृषी अधिकारी अशोक गायकवाड, मा. जिल्हा परिषद सदस्य उल्हास भाऊ बांगर, बाजार समितीचे संचालक सुरेश बांगर, अनिल घरत आदी उपस्थित होते.
कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सुरण लागवड प्रात्यक्षिकाबाबत आमदार कथोरे यांनी सविस्तर माहिती जाणून घेतली. मुरबाड तालुक्यात सध्या सुमारे साडेचार हेक्टर क्षेत्रावर ४५ शेतकऱ्यांनी सुरणाची लागवड केली आहे. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, सुरण हे शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळवून देणारे पीक ठरू शकते, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधताना आमदार किसन कथोरे यांनी पुढील वर्षी सुरण लागवड प्रात्यक्षिकाचा विस्तार करण्याचे आश्वासन दिले. ‘पुढील वर्षी तालुक्यातील १०० शेतकऱ्यांना सुरण लागवडीचे प्रात्यक्षिक देण्याचे नियोजन करण्यात येईल,’ असे त्यांनी सांगितले. यावेळी मंडळ कृषी अधिकारी समाधान शिवशरण, सहाय्यक कृषी अधिकारी स्वप्निल जाधव, अमित सोनवणे, अमोल पडवळे, पोलीस पाटील भानुदास भोईर, कमलाकर भोईर, महेंद्र बांगर, सिताराम भोईर यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


