अंबरनाथ शहरात लोकसंख्या वाढीनुसार पाण्याची मागणी वाढत असून जुन्या आणि त्यानंतर नवीन काही योजनांच्या माध्यमातून पाणी वितरणाचे नियोजन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ढिसाळ कारभारामुळे सध्या शहरात पाणी टंचाईमुळे अनेक वर्षांपासून वसलेल्या वसाहतींमध्ये पाणी तुटवड्याचे संकट ओढवले असून नव्याने विस्तारित क्षेत्रात झपाट्याने उभारल्या जाणाऱ्या गृहसंकुलातील नागरिकांनाही पाणीटंचाई भेडसावत आहे. अशा परिस्थितीत शहरात नवीन पाणीपुरवठा योजना शंभर टक्के पूर्ण होऊन कार्यान्वित होईपर्यंत कोणत्याही नवीन व्यावसायिक आस्थापना, इमारती, टॉवर आणि पुनर्विकसित सोसायट्यांना नवीन पाणी जोडणी (कनेक्शन) देण्यात येऊ नये, अशी आक्रमक मागणी शिवसेना नगरसेवक सुभाष साळुंके यांनी केली आहे.
सध्याच्या पाणी तुटवड्यामुळे मूळ नागरिकांवर अन्याय होत असल्याचे सांगत त्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या (मजीप्रा) कार्यकारी अभियंत्यांना लेखी निवेदन देऊन याबाबत तातडीने लेखी आदेश काढण्याची विनंती केली आहे.


