आशेळेतील पाणी पाणीटंचाईबाबत लहुजी शक्ती सेना आक्रमक

पाणीटंचाई लहुजी शक्ती सेना

केडीएमसी मुख्यालयावर नागरिकांच्या मोर्चाची धडक

कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रभाग क्र. १६, कृष्णा नगर, आशेळे परिसरातील मागील एक वर्षापासून सुरू असलेल्या तीव पाणीटंचाईच्या समस्येबाबत लहूजी शक्ती सेना आक्रमक झाली असून त्यांनी आज नागरिकांसह केडीएमसी मुख्यालयावर मोर्चा काढत धडक दिली.
कृष्णा नगर, आशेळे या परिसरातील नागरिकांना मागील एक वर्षापासून अत्यंत तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. नियमित व पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होत नसल्यामुळे नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुलांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. पाणी हा नागरिकांचा मूलभूत अधिकार व अत्यावश्यक गरज असताना महानगरपालिका प्रशासनाकडून या गंभीर समस्येकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे.
या समस्येकडे प्रशासनाचे तातडीने लक्ष वेधण्यासाठी तसेच कृष्णा नगर, आशाळे परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत व नियमित करण्याच्या मागणीसाठी, स्थानिक रहिवाशांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी भाजपा कल्याण जिल्हा सचिव विजय जोशी यांच्या पुढाकाराने या मोर्चेकरांची केडीएमसी आयुक्तांसोबत बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्रशासनाने गंभीर पाणीटंचाईच्या प्रश्नावर तातडीने ठोस उपाययोजना करावी, ही नागरिकांची प्रमुख मागणी आहे. संपूर्ण कृष्णा नगर, आशाळे प्रभाग क्र. १६ परिसरास दररोज सुरळीत पाणी पुरवठा करण्यात यावा. पाण्याची रात्रीची वेळ बदलून सकाळची वेळ करण्यात यावी. कृष्णा नगर, आशेळे परिसरातील पाणीपुरवठा तातडीने नियमित व सुरळीत करण्याची मागणी यावेळी नागरिकांनी केडीएमसी आयुक्तांकडे केली.

Scroll to Top