भिवंडी शहरातील तीनबत्ती येथील मच्छी मार्केट जीर्ण झाल्याने महापालिकेच्या वतीने जून महिन्यात तोडण्यात आले असून मच्छी, मटण विक्रेत्यांना महापालिका प्रशासनाने पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देवून तसे न केल्याने मटण, मच्छी विक्रेत्या व्यावसायिकांनी काँग्रेस ठाणे जिल्हा ग्रामीणचे सरचिटणीस पंकज गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी महापालिका मुख्यालयाच्या मुख्य गेट समोर आंदोलन केले. महापालिकेकडून जुन्या इमारतीचे पाडकाम केले गेल्याने मच्छी मार्केट मधील मटण, मच्छी विक्रेत्यांवर मागील ३ महिन्यांपासून ६५ कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. तर महापालिका प्रशासनाने मच्छी मार्केटची जुनी इमारत तोडताना नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत मच्छी मार्केटच्या दुसऱ्या इमारतीत तात्पुरत्या स्वरूपात जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु प्रशासनाने आम्ही गेल्या ६५ वर्षांपासून कर भरत असतानाही आमची दिशाभूल करून पर्यायी उपलब्ध केलेली नसून आतापर्यंत आमचा विश्वासघात केला आहे. याविरोधात आम्ही मुख्यमंत्री, पंतप्रधान अशा सर्व स्तरावर पत्रव्यवहार केला आहे. परंतु मनपा प्रशासन त्याबद्दल अक्षम्य दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप मच्छी विक्रेते प्रकाश भोई यांनी केला असून आमच्यावर मागील ३ महिन्यांपासून उपासमारीची वेळ आली असून आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास आम्ही आमरण उपोषण करू असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्या मटण, मच्छी विक्रेत्यांनी दिला.
भिवंडीतील मच्छी विक्रेत्यांचे पर्यायी जागेसाठी महापालिका कार्यालयासमोर आंदोलन



