सात हजाराहून अधिक पोलीस बंदोबस्त
अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत शुक्रवारी तब्बल ७९६ सार्वजनिक आणि ४० हजार २६७ घरगुती गणेशमूर्तीचे विसर्जन होणार आहे. विसर्जन मिरवणुकांमध्ये होणारी गर्दी, वाहतूक कोंडी, मोठ्या आवाजातील ध्वनिक्षेपक आणि डिजेचा वापर यामुळे यंदा पोलिसांसमोर कायदा-सुव्यवस्था राखण्याबरोबरच मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे मोठे आव्हान असणार आहे.
ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि भिवंडी या प्रमुख शहरांचा समावेश होतो. या संपूर्ण क्षेत्रात शुक्रवारी मोठ्या प्रमाणात गणेशमूर्तीचे विसर्जन होणार असल्याने पोलिसांनी मिरवणूक मार्ग, विसर्जन घाट आणि गर्दीची ठिकाणे यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर आणि भिवंडी महापालिका प्रशासनाकडूनही विसर्जन घाटांवर आवश्यक सुविधा आणि उपाययोजना करण्यात आल्या आहेत. दरवर्षी गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये मोठ्या आवाजातील ध्वनिक्षेपक आणि डिजेचा वापर हा चर्चेचा विषय ठरतो. यंदा मात्र मुंबई उच्च न्यायालयाने सण-उत्सवांच्या काळात दिलेल्या निर्देशांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांसमोर नियमांची अंमलबजावणी करण्याचे आव्हान आहे.
मिरवणुकांमध्ये ध्वनिक्षेपकाची मर्यादा, वेळेचे निर्बंध आणि अन्य नियमांचे पालन होते का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे, सण-उत्सवांच्या काळात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासंदर्भातही न्यायालयीन निर्देश लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे विसर्जन मिरवणुकांमध्ये डिजे, ध्वनिक्षेपक आणि फटाक्यांबाबत पोलिसांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. यापूर्वीही ध्वनिप्रदूषणाबाबत न्यायालयाने विविध निर्देश दिले असले तरी, त्यांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याच्या तक्रारी पर्यावरणवाद्यांकडून होत असते.
विसर्जन मिरवणुकांमुळे ठाणे, कळवा-मुंब्रा, दिवा, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि भिवंडी परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांकडून मिरवणूक मार्ग तसेच विसर्जन घाटांच्या परिसरात आवश्यकतेनुसार वाहतूक बदल लागू करण्यात येणार आहेत. विसर्जन घाटांकडे जाणाऱ्या भाविकांना अडचणी येऊ नयेत, यासाठी वाहतूक व्यवस्थेवर विशेष भर देण्यात आला आहे.
विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयातील अधिकारी-कर्मचा-यांसह मुंबई, सोलापूर, खंडाळा, लातूर, रेल्वे पोलीस, राज्य राखीव पोलीस दलाच्या तीन तुकड्या, एक हजार गृहरक्षक दलाचे जवान, पोलीस प्रशिक्षण केंद्रातील कर्मचारी तसेच अन्य जिल्ह्यांतील पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांची मदत घेण्यात आली आहे.
विशेष शाखेकडून साध्या वेशातील १०० हून अधिक पोलीसही तैनात असणार आहेत. अशा प्रकारे एकूण सात हजार ५७० पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त विसर्जनासाठी ठेवण्यात आला आहे.
ठाणे आयुक्तालय क्षेत्रात महापालिका, नगरपालिका प्रशासनासोबत पोलिसांचे समन्वय आहे. सात हजाराहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त विसर्जन स्थळ, मिरवणूक मार्गासह ठिकठिकाणी तैनात असणार आहे. तसेच, मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालासंदर्भात गणेशोत्सव मंडळ आणि डीजे मालकांच्या बैठका घेण्यात आल्या असून त्यांना निकालाची माहिती देण्यात आली आहे.
डॉ. धीरज कुमार बच्चू, पोलीस उपायुक्त, विशेष शाखा, ठाणे पोलीस.



