रासरंगच्या आयोजनाचा निधी संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांना देणार
महाराष्ट्रातील विविध भागांत पावसाच्या अनियमिततेमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यंदाचा डोंबिवलीतील ‘रासरंग दांडिया उत्सव-२०२६’ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. उत्सवासाठी करण्यात येणारा खर्च संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या मदतीसाठी वळविण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, शिवसेना आमदार राजेश मोरे आणि उपजिल्हा प्रमुख राजेश कदम यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी तालुका प्रमुख गजानन पाटील, शरद गंभीरराव, बंडू पाटील, सागर जेधे, संतोष चव्हाण, विवेक खामकर, प्रकाश म्हात्रे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
डोंबिवलीतील नवदुर्गा मित्र मंडळ आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून डी. एन. सी. शाळेच्या मैदानावर दरवर्षी ‘रासरंग’ दांडिया उत्सवाचे आयोजन केले जाते. डोंबिवलीसह कल्याण-डोंबिवली, ठाणे, उल्हासनगर, अंबरनाथ आणि परिसरातील हजारो नागरिक या उत्सवात सहभागी होत असतात. मात्र, यंदा शेतकरी संकटाच्या पार्श्वभूमीवर उत्सवाचा जल्लोष न करता मदतीला प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.



