आनंद भारतीच्या गणरायाचे पर्यावरणपूरक विसर्जनाची परंपरा कायम

आनंद भारतीच्या गणरायाचे पर्यावरणपूरक विसर्जनाची परंपरा कायम

प्रदूषण टाळण्यासाठी शासकीय पातळीवर गणरायांच्या मूर्तीचे पर्यावरणपूरक विसर्जनासाठी वेगवेगळे पर्याय नागरिकांसाठी दिले जातात. पूर्व ठाण्यातील ११६ वर्षांची गणेशोत्सवाची परंपरा असलेल्या श्री आनंद भारती समाजाने यंदाही आपल्या पध्दतीने पुढल्या वर्षी लवकर या अशी साद घालत पर्यावरणाचे नुकसान होणार नाही अशा पद्धतीने गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला.
गणेशोत्सवाचे ११६ वर्ष साजरे केलेल्या श्री आनंद भारती समाजाचा गणेशोत्सव हा ठाण्यातील आद्य समजला जातो. पर्यावरण पुरक विसर्जनाच्या शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देताना गणरायाची पारंपरिक मिरवणूक चेंदणी कोळीवाडा बंदरावर येते. त्याठिकाणी आरती झाल्यावर आपल्या सोबत आणलेल्या मोठ्या पातेल्यातील पाण्यात मूर्तीचे विसर्जन केले जाते. त्यानंतर हे पातेले परत संस्थेच्या क्रीडांगणात ठेवले जाते. काही दिवसांनी मूर्ती पाण्यात विरघळल्यावर ते पाणी संस्थेच्या क्रीडांगणात असलेल्या झाडांना वाहिले जाते. संस्थेच्या खेळाडूंनी पर्यावरण पुरक गणपती विसर्जनाचा वसा कायम राखल्याबद्दल त्यांचा अभीमान वाटत असल्याचे समाजाध्यक्ष हरेश्वर मोरेकर यांनी सांगितले. अधिक माहिती देताना सचिव संदिप कोळी म्हणाले, चित्रकार आणि रंगावलीकार माजी कार्याध्यक्ष महेश कोळी यांनी अशा वेगळ्या पद्धतीने गणेश विसर्जनाची कल्पना मांडली. त्यात विसर्जनानंतरही बाप्पाचे आशीर्वाद संस्थेचे सदस्य, खेळाडू यांच्या पाठीशी राहणार असल्याने त्याला सगळ्यांनीच मान्यता दिली. नेहमीप्रमाणे यंदाही संस्थेचे कार्यकारिणी सदस्य सुनील कोळी यांनी बाप्पाचे विसर्जन केले. अनोख्या पद्धतीने होणारा हा गणेश विसर्जन सोहळा पाहण्यासाठी गणेश भक्तांनी चेंदणी कोळीवाडा बंदरावर एकच गर्दी केली होती.

Scroll to Top