एनएसएस विद्यार्थी व नागरिकांनी केली खाडी किनाऱ्यांची व खारफुटी क्षेत्राची स्वच्छता

एनएसएस विद्यार्थी व नागरिकांनी केली खाडी किनाऱ्यांची व खारफुटी क्षेत्राची स्वच्छता

सेवा संकल्प अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत असून स्वच्छता ही सेवा मोहीमेच्या अनुषंगाने लोकसहभागातून स्वच्छताविषयक उपक्रमांवर भर दिला जात आहे. त्या अनुषंगाने ८ विभाग कार्यालय क्षेत्रात १ सागरी किनार्याच्या ठिकाणी खारफुटी स्वच्छता मोहीमा व्यापक स्वरूपात राबविण्यात येत असल्याची माहिती देत अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी या मोहीमांमध्ये स्वयंसेवी संस्थांप्रमाणेच एनएसएस विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावर लाभलेला सहभाग स्वच्छ नवी मुंबईच्या भविष्यासाठी महत्वाचा असल्याचे सांगितले.
नवी मुंबई महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने डोलाया सागरी किनारा करावे येथील स्वच्छता मोहीमेप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी उपस्थित विद्यार्थी व नागरिक यांच्याशी संवाद साधला. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त डॉ. राहुल गेठे, घनकचरा व्यवस्थापन विभाग उपआयुक्त डॉ. अजय गडदे, बेलापूर विभागाचे सहा. आयुक्त प्रशांत नेरकर, मुख्य स्वच्छता अधिकारी नरेश अंधेर, स्वच्छता अधिकारी पवन कोवे, स्वच्छता निरीक्षक विजय नाईक व लवेश पाटील तसेच मॅनसुव्हज् सोल्जर या सेवाभावी संस्थेचे प्रमुख धर्मेश बराई, एनएसएसच्या जिल्हा समन्वयक डॉ. सुनिता पाल, क्षेत्रीय समन्वयक डॉ. दिपक पोखरकर व निशा बरखातू आणि इतर मान्यवर तसेच २५० हून अधिक एनएसएस विद्यार्थी व नागरिक येथील स्वच्छता मोहीमेमध्ये सक्रिय सहभागी झाले. अशाचप्रकारच्या मोहीमा दिवाळे जेटी बेलापूर, सारसोळे जेटी नेरूळ, वाशी जेटी, तुर्भे तलाव, धारण तलाव सेक्टर 19 कोपरखैरणे, घणसोली जेटी, ऐरोली जेटी सेक्टर 10 आणि दिघा तलाव येथे एनएसएस विद्यार्थी व नागरिकांच्या सक्रिय सहभागातून यशस्वीरितीने राबविण्यात आल्या.
या सर्वच ठिकाणी खाडी किनाऱ्यांवरील खारफुटीमध्ये अडकलेला समुद्रातून वाहून आलेला प्लास्टिक, काच, चपला, बूट, बाटल्या अशा स्वरूपाचा अविघटनशील कचरा गोण्यांमध्ये संकलित करण्यात आला व सागरी किनारा आणि खारफुटी परिसर स्वच्छ करण्यात आला. एस. के. कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स नेरूळ, वेस्टर्न कॉलेज नेरूळ, फकिरजी गणोजी नाईक कॉलेज कोपरखैरणे, सरस्वती कॉलेज बेलापूर, स्टर्लिंग इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी नेरूळ, आयसीएल मोतीलाल झुनझुनवाला महाविद्यालय वाशी, दत्ता मेघे कॉलेज ऑफ इंजिनिअरींग ऐरोली, सुशिलादेवी देशमुख महाविद्यालय ऐरोली, न्यू होरायड़ान कॉलेज ऑफ कॉमर्स ऐरोली, टिळक कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स वाशी, डीव्हीएस कॉलेज ऑफ कॉमर्स कोपरखैरणे, लोकमान्य टिळक कॉलेज ऑफ इंजिनिअरींग कोपरखैरणे, रामशेठ ठाकूर कॉलेज खारघर, फा. सी. रॉड्रीग्ज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी वाशी, राजीव गांधी कॉलेज वाशी, सानपाडा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड टेक्नॉलॉजी, श्रीम. इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरींग घणसोली, ए. सी. पाटील कॉलेज, मेहता डिग्री कॉलेज ऐरोली, स्टर्लिंग कॉलेज आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स नेरूळ, बंट्स इन्स्टिट्यूट नेरूळ, एमजीएम कॉलेज, सागरी सीमा मंच अशा विविध महाविद्यालयांमधील 2 हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी आपापल्या महाविद्यालयीन क्षेत्राच्या विभागातील खारफुटी स्वच्छता मोहीमेत सहभाग घेतला.

Scroll to Top