मुंबई नाशिक महामार्गावर मिक्सर ट्रक उलटला

खारेगाव टोलनाक्यापर्यंत वाहनांच्या रांगा

खारेगाव टोलनाक्यापर्यंत वाहनांच्या रांगा

मुंबई-नाशिक महामार्गावरील हायवे दिवे हद्दीतील गणेश घाट परिसरात सिमेंट मिक्सर पलटी झाल्याने बुधवारी सकाळी महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. या अपघातात मिक्सर चालक किरकोळ जखमी झाला आहे. अपघातामुळे वाहनांच्या रांगा थेट खारेगाव टोलनाक्यापर्यंत लागल्याने मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.
खारेगाव टोलनाक्याकडून माणकोलीच्या दिशेने जात असताना गणेश घाट परिसरात सिमेंट मिक्सर अचानक पलटी झाला. मिक्सर ट्रक रस्त्यावरच आडवा झाल्याने महामार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे काही वेळातच वाहनांची मोठी रांग लागली होती.
अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल होत पलटी झालेला सिमेंट मिक्सर बाजूला करण्यासाठी तीन ते चार तास अथक प्रयत्न केल्यानंतर दोन क्रेनच्या सहाय्याने या ट्रकला बाजूला करण्यात आले. मात्र तोपर्यंत महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी झाल्याने वाहनचालकांना कोंडीचा सामना करावा लागला. मिक्सर बाजूला केल्यानंतर वाहतूक पूर्ववत होण्यास सुरुवात झाल्याची माहिती वाहतूक पोलिस परशुराम शेळके यांनी दिली.

Scroll to Top