विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने जनविकास महाभियान आणि रेड स्वस्तिक सोसायटी, भारत यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच वज्रेश्वरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सहकार्याने न्यू इंग्लिश स्कूल, वज्रेश्वरी येथे शनिवारी मोफत आरोग्य, रक्तगट, सिकलसेल अॅनिमिया व फेरीटिन तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात सुमारे १ हजार विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी गणेशपुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पाटील, जनविकास महाभियानचे मुख्य संयोजक संतोष भोईर आणि रेड स्वस्तिक सोसायटी, भारतचे डॉ. प्रमोद नांदगावकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. टिटवाळा येथील रहिवासी प्रमोद नांदगावकर यांनी रेड स्वस्तिक सोसायटीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध आरोग्य व सेवाभावी उपक्रमांची माहिती दिली. समाजातील विविध घटकांपर्यंत आरोग्यसेवा आणि आरोग्यविषयक जनजागृती पोहोचविण्यासाठी मागील २५ वर्षांपासून संस्था कार्यरत असून आपल्या मुलभूत गरजा अन्न, वस्त्र निवांऱ्यासोबत आता शिक्षण व आरोग्य हि आवश्यक असून आरोग्याबाबत सर्वांनी जागरूक राहणे काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
शिबिरासाठी डॉ. पुष्पराज स्वामी, डॉ. सूरज भानुशाली, डॉ. अतुल जाधव, डॉ. जयेश भोये, शहापूर उपजिल्हा रुग्णालयाचे लॅब सहाय्यक भास्कर भोईर, स्पर्श फाउंडेशन, वैद्यकीय अधिकारी तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीसोबतच आरोग्यविषयक जनजागृतीला चालना देणाऱ्या या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
वज्रेश्वरीत सुमारे १ हजार विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य व रक्तगट तपासणी शिबिर



