विकासाच्या नावाखाली शहर भकास करण्याचा सपाटा; वृक्षतोड, मोकळ्या जागांची कत्तल
निसर्गाचे वरदान लाभलेल्या ठाण्याला काँक्रीटच्या जंगलात रूपांतरित करण्याचा सपाटा सुरू असताना, ३८ अंशांचा पारा आणि मध्यरात्रीची उष्णता शहराच्या नियोजनावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे करत आहे. विकासाच्या नावाखाली वृक्षतोड आणि मोकळ्या जागांची कत्तल सुरूच राहिली, तर ठाण्याचा “निसर्गदत्त” गारवा इतिहासजमा होण्यास वेळ लागणार नाही !
ऑक्टोबर हीटच्या वाढत्या तडाख्यामुळे ठाणेकर हैराण झाले असून, कमाल तापमान ३८ अंशांवर पोहोचल्याने शहरातील उष्णतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. डोंगररांगा, तलाव, खाडी आणि हिरवाईची नैसर्गिक संपत्ती लाभलेल्या शहरात मोठ्या प्रमाणावर बांधकामे आणि काँक्रीटीकरण सुरू आहे. उंच इमारती आणि रुंद रस्त्यांच्या विस्तारात शहराची नैसर्गिक ओळख मात्र पुसली जात असल्याचे चित्र आहे. विकासकामांचा धडाका सुरू असताना पर्यावरण संरक्षणाच्या उपाययोजनांचा वेग किती आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. काँक्रीट आणि डांबरी रस्ते दिवसभर सूर्याची उष्णता शोषून घेतात आणि रात्री ती हळूहळू वातावरणात सोडतात. त्यामुळे सूर्यास्तानंतरही शहरातील तापमान अपेक्षेप्रमाणे कमी होत नाही. शहरी भागात आसपासच्या परिसरापेक्षा अधिक तापमान जाणवण्याच्या या स्थितीला ‘अर्बन हीट आयलंड’ परिणाम म्हटले जाते. वाढती बांधकामे, वाहनांची वर्दळ आणि घटते हरित क्षेत्र या स्थितीला हातभार लावू शकतात. त्यामुळे ठाण्यातील वाढत्या उष्णतेचा अभ्यास करून शहराच्या नियोजनात आवश्यक बदल करण्याची गरज निर्माण झाली असल्याचे पर्यावरण अभ्यासक डॉ प्रशांत सिनकर यांनी सांगितले.
विकासकामे आणि विविध प्रकल्पांमुळे जुन्या, मोठ्या वृक्षांवर येणारी कुन्हाड हा पर्यावरणाच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे. झाडे सावली देण्याबरोबरच बाष्पोत्सर्जनाद्वारे परिसरातील उष्णता कमी करण्यास मदत करतात. मात्र, वृक्षारोपणाच्या मोहिमांवर भर देताना अस्तित्वातील मोठ्या वृक्षांचे संरक्षण कितपत होते, याचाही हिशेब आवश्यक आहे. किती झाडे तोडली, किती रोपांची लागवड केली आणि त्यापैकी किती जगली, याची माहिती सार्वजनिक करण्याची मागणी पर्यावरणप्रेमींकडून केली जात आहे.
ठाणे शहराची ओळख असलेल्या तलावांसह खाडी, पाणथळ जागा आणि मोकळ्या जमिनींवरील वाढता दबावही चिंतेचा विषय आहे. मोकळ्या जमिनींवर काँक्रीटचे आच्छादन वाढल्यास पावसाचे पाणी जमिनीत मुरण्याचे प्रमाण कमी होऊ शकते.
३८ अंशांचा तापलेला पारा ठाण्याच्या बदलत्या पर्यावरणाचा इशारा आहे. विकासाच्या नावाखाली वृक्षतोड आणि मोकळ्या जागांची कत्तल थांबवून निसर्गाचे संरक्षण करण्यासाठी राजकीय नेतृत्व व सरकारी यंत्रणांनी ठोस कृती करावी. अन्यथा, निसर्गसंपन्न ठाणे काँक्रीटच्या जंगलात हरवेल.
-डॉ. प्रशांत सिनकर, पर्यावरण अभ्यासक, ठाणे



