भिसोळ आणि पवई येथे १४९ निरंकारी भक्तांचे उत्स्फूर्त रक्तदान

भिसोळ आणि पवई येथे १४९ निरंकारी भक्तांचे उत्स्फूर्त रक्तदान

सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या शिकवणुकीने प्रेरित होऊन, संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे रविवारी कल्याणमधील भिसोळ आणि मुंबईतील पवई येथे दोन रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांना निरंकारी श्रद्धाळूसह स्थानिक नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संत निरंकारी ब्लड बँक, विलेपार्ले यांच्या वतीने दोन्ही शिबिरांत एकूण १४९ युनिट रक्त संकलित करण्यात आले.
कल्याण तालुक्यातील संत निरंकारी मिशनच्या भिसोळ शाखेतर्फे संत निरंकारी सत्संग भवन, पांजरापोळ येथे आयोजित रक्तदान शिबिरात एकूण ४८ जणांनी रक्तदान केले. त्यात ३४ पुरुष आणि १४ महिलांचा समावेश होता. ग्रामीण भाग असूनही निरंकारी श्रद्धाळूनी अत्यंत उत्साहाने आणि निःस्वार्थ सेवाभावाने या शिबिरात सहभाग घेतला.
परमात्म्याच्या प्रति प्रार्थनेने या शिबिराचा शुभारंभ झाला. या प्रसंगी मिशनच्या डोंबिवली झोनचे प्रभारी रावसाहेब हसबे, सेक्टर संयोजक जगन्नाथ म्हात्रे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष राम सुरोशी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. संत निरंकारी मिशनतर्फे केल्या जाणाऱ्या सामाजिक सेवा कार्याची मान्यवरांनी प्रशंसा केली.
संत निरंकारी मिशनच्या आयआयटी पवई सूर्यनगर आणि टागोर नगर शाखांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात १०१ युनिट रक्त संकलित झाले. दोन्ही शिबिरांचे यशस्वी आयोजन संबंधित शाखांच्या मुखींच्या देखरेखीखाली, सेवादल सदस्य आणि संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या स्वयंसेवकांच्या सहकार्याने करण्यात आले.

Scroll to Top