मनाच्या जखमांवर औषधांसोबत मायेची फुंकरही गरजेची असते. मानसिक आजारांविषयीचे गैरसमज दूर करून रुग्णांना सन्मानाने जगण्याचा आधार देण्यासाठी प्रादेशिक मनोरुग्णालय, ठाणे यांनी जागतिक मानसिक आरोग्य सप्ताहानिमित्त विविध जनजागृतीपर उपक्रम राबविले. रुग्णांच्या वेदना समजून घ्या, त्यांना नाकारू नका, तर माणुसकीचा हात द्या, हा संवेदनशील संदेश या उपक्रमांतून देण्यात आला. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नेताजी मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, मानसिक आरोग्य आढावा मंडळ, ठाणे, आर. डी. सावंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. जिल्हा न्यायाधीश-१ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी. डी. शेळके आणि प्राधिकरणाचे सचिव रवींद्र पाजनकर यांची विशेष उपस्थिती होती. यंदाच्या ‘Lived Experiences, Heard Real Voices, Real Change’ या संकल्पनेनुसार विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या मानसिक आरोग्यविषयक पोस्टर प्रदर्शनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर रुग्णालयातील सिस्टर इन्चार्ज आणि डीपीएन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या दोन पथनाट्यांतून मानसिक आजारांचा सामना करणाऱ्या व्यक्तींचे अनुभव, सामाजिक कलंक, दैनंदिन अडचणी आणि उपचारांसोबत आपुलकी व सहकार्याचे महत्त्व प्रभावीपणे मांडण्यात आले. प्रमुख पाहुणे आर. डी. सावंत यांनी मानसिक आरोग्य आणि कायदा यांच्यातील संबंध स्पष्ट करत मानसिक आजारांनी प्रभावित व्यक्तींचे कायदेशीर हक्क, मानवी प्रतिष्ठा आणि त्यांना मिळणा-या संरक्षणाविषयी मार्गदर्शन केले. मानसिक आरोग्य जनजागृती केवळ एखाद्या दिनापुरती किंवा सप्ताहापुरती मर्यादित न राहता ती दैनंदिन जीवनाचा भाग व्हावी, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचा समारोप मानसिक आरोग्य जनजागृती रॅलीने झाला. प्रमुख पाहुण्यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात केली. ठाणे शहरातून काढलेल्या या रॅलीतून मानसिक आजारांविषयीचे गैरसमज दूर करणे, रुग्णांशी भेदभाव टाळणे आणि त्यांना सन्मानाने जगण्यासाठी सहकार्य करणे, असे आवाहन करण्यात आले.
मानसिक आरोग्य जनजागृतीसाठी ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाचा पुढाकार पथनाट्ये, पोस्टर प्रदर्शन आणि रॅलीतून संवेदनशीलतेचा संदेश



