स्व. हिराबाई दुंदाजी सोनावणे यांच्या स्मरणार्थ ग्रामपंचायत अधिकारी परेश सोनावणे यांच्या माध्यमातून येथील जवळपास बारा शाळांमधील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती पुस्तक संचाचे वाटप करण्यात आले.
येथील डोहोळे ग्रामपंचायत अधिकारी परेश सोनावणे यांनी सामाजिक दातृत्वाची भावना जपत आपली आजी, लाडक्या ‘बय’ स्व. हिराबाई दुंदाजी सोनावणे यांच्या स्मरणार्थ ‘मिशन भरारी’ हा सामाजिक कार्य उपक्रम हाती घेतला असून या माध्यमातून कोशिंबी केंद्रातील जवळपास दहा व पडघा येथे दोन अशा जवळपास बारा शाळांमधील विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी मदत व्हावी या उद्देशाने पुस्तक संचाचे वितरण करण्यात आले.
दरम्यान, परेश सोनावणे यापूर्वीही आजीच्या स्मरणार्थ डोहोळेपाडा जिल्हा परिषद शाळेत ग्रंथालयासाठी २५ हजार रुपये रोख रक्कम आदी शैक्षणिक साहित्य मदत व कांदली कातकरी वाडी येथे विद्यार्थ्यांना दोन टेबल उपलब्ध करून दिले तसेच स्वतःच्या पुढाकाराने आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने लोकवर्गणी जमा करून कळंबोली जि.प.शाळेला दूरचित्रवाणी संच उपलब्ध करून दिला. त्याचबरोबर, डोहोळे ग्रामपंचायत येथे रुजू झाल्यापासून सोनावणे यांनी या कालावधीत गटविकास अधिकारी गोविंद खामकर, विस्तार अधिकारी सुधाकर सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली व ग्रामपंचायत समिती, कर्मचारी, ग्रामस्थ यांच्या सहकार्याने ग्रामपंचायतीला अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत. तर परेश सोनावणे यांनाही ‘आदर्श ग्रामपंचायत अधिकारी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांना मोफत शिष्यवृत्ती पुस्तक संचाचे वाटप



