कवी बाळासाहेब तोरस्कर तितिक्षा सर्वोत्कृष्ट ग्रंथ पुरस्काराने सन्मानित

जेष्ठ कवी, लेखक, गीतकार, समाजसेवक, पत्रकार बाळासाहेब तोरस्कर यांना त्यांच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या “शब्द झेलताना” या कवितासंग्रहास तितिक्षा इंटरनॅशनल संस्थेचा ‘सर्वोत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार’ ( छंदोबद्ध कविता ) प्राप्त झाला आहे.

तितिक्षा सेवाभावी संस्था अंतर्गत तितिक्षा इंटरनॅशनल पुणे, यांच्या वतीने ‘तितिक्षा उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार वितरण सोहळा’ नुकताच पुणे येथील भारत इतिहास संशोधन मंडळाच्या पोतदार सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात तोरस्कर यांना साहित्यिक सुभाष सोनवणे, नाट्यकलावंत निलेश दातार, मनोतज्ञ सुजित पवार, संगीतकार जयंत भिडे, ज्येष्ठ विचारवंत राजेश्वर हेंद्रेव, तितिक्षा इंटरनॅशनल संस्थेच्या संस्थापिका प्रिया दामले या मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. 

साहित्य विभागातील उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कारांमध्ये उत्कृष्ट साहित्य निर्मितीसाठी रामदास खरे, दत्तात्रेय सैतवडेकर, कविता झुंजारराव, स्मिता दातार, विकास भावे अशा अनेक साहित्यिकांचा वेगवेगळ्या साहित्य प्रकारातील साहित्य कृतींसाठी सत्कार करण्यात आला. तोरस्कर यांचा हा कवितासंग्रह राजसा प्रकाशन, उल्हासनगर यांनी प्रकाशित केला असून त्याला डॉ. श्रीपाल सबनीस यांची प्रस्तावना लाभली आहे.

सुप्रसिद्ध साहित्यिक अशोक बागवे यांनी पाठराखण केली आहे. “शब्द झेलताना” हा बाळासाहेब तोरस्करांचा नवा कवितासंग्रह मानवी अनुभूतीचा समग्र असा काव्यात्म नजराणा आहे. देव, धर्म, संत, महापुरुष, निसर्गप्रेम, क्रांती आणि शांतीच्या विविध काव्यात्म अनुभूतिना कवि तोरस्कर निवडक व सुंदर शब्दांच्या मुशीतून झेलतात असे डॉ. सबनिसानी आपल्या प्रस्तावनेत म्हटले आहे.तोरस्कर हे साहित्यिक, सांस्कृतिक, सामाजिक, पत्रकारिता, शैक्षणिक व फार्मास्युटिकल क्षेत्रात गेली अनेक वर्षे कार्यरत असून ते अनेक साहित्यिक व सामाजिक संस्थाचे संस्थापक पदाधिकारी आहेत. ते साहित्य संपदा दिवाळी अंकाचे निवासी संपादक, कृषिराज दिवाळी अंकाचे सहसंपादक, राष्ट्रीय शिक्षक संचेतनाचे प्रदेशाध्यक्ष, 

अ.भा.मराठी साहित्य परिषदेचे ठाणे विभागीय अध्यक्ष, काव्यप्रेमी शिक्षक मंचचे राज्य सल्लागार समिती सदस्य आदि पदावर कार्यरत आहेत. त्यांचे ३ कविता संग्रह प्रकाशित असून त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. तोरस्कर यांना त्यांच्या विविध क्षेत्रातील योगदानाबद्दल अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांच्या पुरस्काराबद्दल समाजातील सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top