तानशेत रेल्वे स्थानक परिसरातील अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू

शहापूर – कळमगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच लीलाधर किसन भोईर यांनी तानशेत रेल्वे स्थानक परिसरातील कथित अनधिकृत बांधकामे हटविण्याच्या मागणीसाठी शहापूर तहसील कार्यालयाच्या आवारात आमरण उपोषण सुरू केले आहे. प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही कारवाई होत नसल्याचा आरोप करत त्यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. उपसरपंच लीलाधर भोईर यांनी यापूर्वी ८ एप्रिल २०२६ रोजी तहसील कार्यालयाला निवेदन देऊन तानशेत रेल्वे स्थानकाच्या पश्चिम बाजूस आदिवासी लोकांना उदरनिर्वाहासाठी देण्यात आलेल्या जमिनीवर काही परप्रांतीयांकडून अनधिकृत बांधकामे करण्यात आल्याचा आरोप केला होता. संबंधित बांधकामांमुळे स्थानिक आदिवासी व ग्रामस्थांच्या हक्कांवर गदा येत असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले होते. या प्रकरणी तहसील कार्यालयाने संबंधित बांधकामधारक आणि जमीनमालकांना.

नोटीस बजावून खुलासा सादर करण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिल्याचे पत्राद्वारे कळविण्यात आले होते. तसेच खुलासा प्राप्त झाल्यानंतर पुढील र कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले होते. याच पार्श्वभूमीवर नियोजित उपोषण मागे घेण्याची विनंती तहसीलदार कार्यालयाकडून करण्यात आली होती. मात्र, प्रशासनाने दिलेल्या मुदतीनंतरही प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप करत लीलाधर भोईर यांनी पुन्हा निवेदन सादर केले. “१५ दिवसांत कारवाई होईल,” असे आश्वासन देण्यात आले होते, परंतु आजपर्यंत अनधिकृत बांधकामांवर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ११ मे रोजी सकाळी १० वाजल्यापासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. या उपोषणामुळे शहापूर तालुक्यातील तानशेत परिसरातील अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून प्रशासन आता कोणती भूमिका घेणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top