ठाणे – परिचारिका क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत राज्य शासनाकडून दिला जाणारा अत्यंत मानाचा राज्यस्तरीय फ्लॉरेन्स नायटिंगेल पुरस्कार यंदा ठाणे जिल्हा सर्वसामान्य रुग्णालयातील परिचारिका महाविद्यालयाच्या प्राचार्या प्राजक्ता अभिजीत सुतार (मोकल) यांना मिळाला असून त्यांच्या या यशामुळे ठाणे जिल्ह्यासह संपूर्ण परिचारिका क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
प्राजक्ता सुतार यांनी यापूर्वी मुंबई येथील शासकीय परिचर्या महाविद्यालय, आणि सध्या त्या कामा व आल्बलेस रुग्णालय येथे पाठ्यनिर्देशिका म्हणून कार्यरत आहेत.
तसेच विठ्ठल सायना सामान्य रुग्णालयात विविध जबाबदाऱ्या सांभाळत जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली परिचारिका शिक्षण आणि रुग्णसेवा क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या दीर्घकालीन सेवाभाव, कार्यतत्परता आणि विद्यार्थ्यांना दिलेल्या मार्गदर्शनाची दखल घेत राज्य शासनाने त्यांना या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्याचा निर्णय घेतला.फ्लॉरेन्स नायटिंगेल पुरस्कार हा परिचारिका व्यवसायातील सर्वात महत्त्वाचा आणि प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला जातो. रुग्णसेवा, परिचारिका शिक्षण, आरोग्य व्यवस्थापन आणि समाजाप्रती केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.


