सूर्य डोक्यावर, सावली गायब; कल्याणमध्ये अनोखा अनुभव

शून्य सावली दिवसाचे उत्साहात निरीक्षण

आकाश मित्र मंडळ आणि सुभेदारवाडा कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी कल्याण येथील सुभाष मैदानावर ‘शून्य सावली दिवस निरीक्षण’ कार्यक्रम उत्साहात पार पडला. या विशेष खगोलीय घटनेचे निरीक्षण करण्यासाठी विद्यार्थी, विज्ञानप्रेमी आणि खगोल अभ्यासकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.

कार्यक्रमात आकाश मित्र मंडळाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ खगोल अभ्यासक हेमंत मोने यांनी ‘शून्य सावली दिवस’ ही घटना नेमकी कशी घडते, वर्षातून ती कधी अनुभवायला मिळते आणि त्यामागील

खगोलशास्त्रीय कारणे कोणती, याचे सोप्या – आणि रंजक भाषेत मार्गदर्शन केले. सूर्य पृथ्वीच्या अगदी डोक्यावर येत असल्याने – काही क्षणांसाठी वस्तूंची सावली दिसेनाशी – होते, ही या घटनेची वैशिष्ट्यपूर्ण बाब – असल्याचे त्यांनी सांगितले.

ज्येष्ठ खगोल अभ्यासक व शास्त्रज्ञ अरविंद कोलगे यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे शून्य सावली निरीक्षण दाखवून उपस्थितांना या खगोलीय घटनेचा अनुभव दिला. विद्यार्थ्यांनी आणि विज्ञानप्रेमींनी विविध प्रयोग व निरीक्षणांमध्ये उत्साहाने सहभाग घेतला. कार्यक्रमादरम्यान उपस्थितांच्या शंकांचे निरसनही करण्यात आले,

आकाशमित्र मंडळाचे सदस्य तथा खगोल अभ्यासक विद्येश कुलकर्णी, संजय पांडे, निखिल गेडाम आणि अर्चित गोखले यांनीही शून्य सावली दिवसाचे वैज्ञानिक महत्त्व आणि खगोल अभ्यासातील त्याची उपयुक्तता याबाबत माहिती दिली. या कार्यक्रमाला माजी आमदार नरेंद्र पवार, प्रा. राजेंद्र कवठेकर यांच्यासह ५० जण उपस्थित होते. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण करणे, वैज्ञानिक दृष्टिकोन वाढविणे आणि भविष्यातील शास्त्रज्ञ घडविण्यासाठी प्रोत्साहन देणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. विज्ञानप्रेमींनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने कार्यक्रमाला विशेष रंगत आली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top