संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील १९३ एकर भूखंडाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाच काही दिवसांपूर्वीच येथील वहिवाट नागरिकांसाठी बंद करण्यात आली होती. अखेर रविवारी सकाळी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सकाळी चालण्यासाठी जाणारे नागरिक आणि राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) कार्यकर्त्यांनी घटनास्थळ गाठून वहिवाट मोकळी केली.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पायथ्याशी असलेल्या भागातील १९३ एकर भूखंडाचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. मागील ५० वर्षांपासून या प्रकरणाचा वाद न्यायालयात सुरु होता. मुंबई उच्च न्यायालयाने कंपनीच्या बाजूने निकाल दिला होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या या निकालानंतर वनविभागाने सर्वोच्च न्यायालयात
केलेल्या दाव्यामुळे २७ एप्रिलला मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला स्थगिती देण्यात आली. तरीही, निसर्ग परिचय केंद्राच्या भागात पत्रे लावून नागरिकांच्या वहिवाटेचा रस्ता अडविण्याचा प्रयत्न झाला होता.
निसर्ग परिचय केंद्राच्या जंगलात विविध पक्षी, प्राणी, वनस्पती, तलाव आहे. त्यामुळे दररोज ठाण्यातील विविध भागातून नागरिक निसर्ग परिचय केंद्रात चालण्यासाठी येत असतात. ज्येष्ठ नागरिकांचाही यामध्ये सामावेश आहे. परंतु वहिवाट बंद करण्याचा प्रयत्न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी होती. ही माहिती राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) पदाधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी रविवारी सकाळी घटनास्थळ गाठले. त्यांच्यासोबत काही नागरिक आणि पक्षाचे कार्यकर्ते होते. त्यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांशी आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधू वहिवाट मोकळी करून दिली. कंपनीच्या म्हणण्यानुसार, बांधकाम करण्यास स्थगिती दिलेली नाही.


