पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आपल्या नियोजित दिल्ली दौऱ्यासाठी खाजगी विमानाऐवजी एअर इंडियाच्या प्रवासी विमानातून करण्याचा निर्णय घेतला. आज दुपारी ४ वाजताच्या एअर इंडियाच्या प्रवासी विमानाद्वारे मुंबईहून दिल्लीला रवाना झाले.
यावेळी शिंदे यांचे मुंबई विमानतळावर उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी अनेकांनी त्यांच्यासोबत फोटो काढून घेतले. तर काहींनी त्यांना भेटून आपले निवेदन त्यांच्या हाती दिले. या सर्वांना भेटून त्यांचे अभिवादन स्वीकारत शिंदे यांनी आपले विमान गाठले.
केंद्रीय नगरविकास विभागाच्या वतीने दिल्लीत स्वच्छ भारत मिशन अर्बन २.० ची विशेष आढावा बैठक आज आणि उद्या दिल्लीत आयोजित केली आहे. या बैठकीत सहभागी होण्यासाठी शिंदे आज दुपारी दिल्लीला रवाना झाले. उद्या ते स्वतः या बैठकीत सहभागी होणार आहेत. एरवी खाजगी विमानाने प्रवास करणाऱ्या शिंदे यांनी यावेळी मात्र सर्वसामान्य नागरिकाप्रमाणे प्रवासी विमानाने दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला.


