दिशा चुकलेल्या समाजाला फक्त चांगला शिक्षकच योग्य दिशा दाखवू शकतो. आमच्या शिक्षकांनी फक्त आमचाच विचार केल्यामुळे आम्ही घडू शकलो. नव्या वाटेवर चालू शकलो. सैरभैर झालेल्या नव्या पिढीला चांगला शिक्षकच दिशा दाखवू शकतो’ असे गौरोदगार कवी विशुभाऊ बापट यांनी काढले.
‘शारदा प्रकाशन’ व ‘भायखळा मनपा शाळा माजी विद्यार्थी संघ’ यांनी आयोजित केलेल्या कवयित्री दया घोंगे लिखित ‘कृतार्थ’ व ‘रत्नाक्षरे’ (द्वितीय आवृत्ती) या दोन पुस्तकांच्या प्रकाशन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर सौ. उमा बापट, डॉ. संतोष राणे, एसीपी रवींद्र दौंडकर, एसीपी किशोर शिंदे, डॉ. गोरक्ष धोत्रे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात ‘मातीतील मोती’ अंतर्गत रवींद्र दौंडकर, किशोर शिंदे, डॉ. गोरक्ष धोत्रे या सामान्य परिस्थितीतून वर आलेल्या, पण आज स्वकर्तृत्वाने यशाचे शिखर गाठलेल्या अशा, शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा दया घोंगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
शाळेच्या वास्तूची माती ही पवित्र असतेच. त्याच मातीत उगवलेले हे बहुमोल मोती आहेत, अशा शब्दात त्यांचा गौरव दया घोंगे यांनी केला. ‘शिष्यात् इच्छेत् पराजयम्’ या संस्कृत वचनाचा संदर्भदेऊन, शिष्याकडून पराजय होण्यातच गुरूची जीत असते असे आवर्जून सांगून, आज कृतार्थ झाल्याचे त्यांनी सांगितले.
वक्त्या सौ. उमा बापट यांनी दोन्ही पुस्तकांचे अत्यंत सखोल अभ्यासपूर्ण असे विवेचन केले. जवळजवळ सर्व कवितांचा परिचय करून देत रसिकांनी हे पुस्तक आवर्जून वाचावे असे आवाहन केले.
यावेळी व्यवसायासाठी अध्यापन क्षेत्र – निवडलेल्या गुणी शिक्षकांचा, व इतर कला गुण अंगी असणाऱ्यांचा या वेळी – गौरव करण्यात आला. यात प्राजक्ता – कुलकर्णी, मंजिरी पैठणकर, पद्माकर – भावे, गायत्री रॉय, कैलास बडगुजर, मंजुषा बुरुजवाले, स्वाती नातू तसेच रवींद्र कारेकर, संपत वरे, शमिका केळकर, – वर्षा पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव – करण्यात आला.
या शिवाय, निरपेक्ष सेवावृत्तीबद्दल – आनंद खेडकर व संजय ताम्हाणे यांचा न विशेष सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात रवींद्र कारेकर यांची सरस्वतीवंदना व शमिका केळकर हिने गायलेली राष्ट्रवंदना यांनी रसिकांचे मन जिंकून घेतले. वर्षा पाटील यांनी मान्यवरांचा व माधुरी डोंगरे यांनी दया घोंगे यांचा सुंदर परिचय करून दिला. आनंद खेडकर यांचे उत्स्फूर्त व खुसखुशीत सूत्रसंचालन सर्वांचीच वाहवा मिळवून गेले. शेवटी मंजिरी पैठणकर यांनी आभारप्रदर्शन केले. हा सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यात दया घोंगे यांची मुलगी उन्नती व सून स्वाती यांनी मोलाचा वाटा उचलला.


