अंबरनाथ अटल सूर्योदय उद्यान नागरिकांसाठी खुले

अंबरनाथ पूर्व सूर्योदय सोसायटी परिसरात शिवसेना नगरसेवक कुणाल भोईर आणि अपर्णा भोईर यांच्या प्रभागात असलेल्या अटल सूर्योदय उद्यानाचा अत्यंत उत्तम पद्धतीने आणि खुल्या मैदानाचे अस्तित्व जपत आणि नागरिकांच्या सूचनांनुसार पुनर्विकास करण्यात आला आहे. तसेच या उद्यानाचे नाव आता भारतरत्न स्व. अटल बिहारी वाजपेयी उद्यान असे ही करण्यात आले असून नागरिकांसाठी हे उद्यान खुले करण्यात आले आहे. या उद्यानाची संपूर्ण पाहणी केल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

अटल उद्यानात नागरिकांना बसण्यासाठी उत्तम पद्धतीची शेड असलेली आसनव्यवस्था, लहान मुलांना खेळण्यासाठी प्लेईंग एरिया, दोन बॅडमिंटन कोर्ट, मचाणची देखील उद्यानात उभारणी करण्यात आली आहे. उद्यानात नियमित स्वरूपात अनेक नागरिक चालण्यासाठी येत असतात, याच पार्श्वभूमीवर उद्यानात सिंथेटिक जॉगिंग ट्रॅकची उभारणी करण्यात आली आहे. सर्व सोयीसुविधांनी युक्त अशा या उद्यानामुळे अंबरनाथमधील नागरिकांना आपल्या कुटुंबासमवेत, मित्रपरिवारासमवेत वेळ घालवण्यासाठी, विरंगुळ्यासाठी एक हक्काचे ठिकाण उपलब्ध झाले आहे. यावेळी आमदार डॉ. बालाजी किणीकर, नगराध्यक्षा तेजश्री करंजुले, उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील, उपजिल्हा प्रमुख राजेश कदम, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, गटनेते आणि नगरसेवक रवींद्र करंजुले, नगरसेवक राजेंद्र वाळेकर, अब्दुलभाई शेख, शैलेश भोईर, सचिन पाटील, मीरा शेलार, अल्पना गोर, सुनीता बागुल, दिलीप आढाव, रोहिणी भोईर, किरण चौबे, भाजपा गटनेते आणि नगरसेवक अभिजित करंजुले- पाटील, विश्वजित करंजुले-पाटील यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top