डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान आणि प्रोबेस कंपन्यांच्या स्फोटाने बाधित झालेल्या नागरिकांना शासनाने अद्याप कोणत्याही प्रकारची भरपाई दिली नसल्याने या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी शनिवारी उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या डोंबिवली विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी शहरात आंदोलन केले. या दोन्ही कंपन्यांच्या स्फोटातील बाधितांना तात्काळ भरपाई देण्याची मागणी केली. मे २०१६ मध्ये डोंबिवली एमआयडीसीत प्रोबेस कंपनीत भीषण स्फोट झाला होता. मे २०२६ मध्ये याच भागातील अमुदान कंपनीत स्फोट झाला होता. या दोन्ही कंपन्यांच्या स्फोटात सुमारे २५ नागरिक, कामगार मरण पावले होते. ३०० हून अधिक जखमी झाले होते. या कंपन्याच्या परिसरातील मालमत्तांचे नुकसान झाले होते. या सर्व बाधितांना भरपाई देण्याचे शासनाने आश्वासन दिले होते. सर्व बाधितांच्या मालमत्तांचे पंचनामे शासनाने केले होते. पण तरीही भरपाई देण्यात आलेली नाही, असा बाधितांचा आरोप आहे. या घटनांना दहा वर्ष आणि तीन वर्ष झाली तरी मदत मिळत नसल्याने ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी बाधितांच्या भरपाईसाठी डोंबिवलीत शनिवारी अनुदान कंपनी परिसरातील सोनारपाडा येथील टेम्पो नाका भागात आंदोलन केले. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांना यासंदर्भात एक निवेदन देण्यात येणार आहे. विधिमंडळात या प्रकरणी आवाज उठविण्यात यावा अशी मागणी कल्याण लोकसभेचे जिल्हाप्रमुख अभीजित सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ नेते आदित्य ठाकरे यांच्याकडे करणार आहे. या आंदोलनात अमुदान कंपनी स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या रोहिणी चंद्रकांत कदम यांचे वडील चंद्रकांत कदम आणि मनोज जोंधळे यांच्या पत्नी सरला (मनिषा) जोंधळे उपस्थित होते. मालमत्ता नुकसान पीडितांपैकी मुकेश बळीराम म्हात्रे आणि इतर नागरिकही उपस्थित होते. आंदोलन जिल्हाप्रमुख अभीजित सावंत यांच्या नेतृत्वाखाली माजी विभागप्रमुख राजू नलावडे, जिल्हा सचिव सुधीर पाटील, जिल्हा युवा अधिकारी प्रतिक पाटील, शहरप्रमुख सुरेश परदेशी, प्रमुख संघटक गजानन पाटील, उपतालुका प्रमुख किरण पाटील, जगदीश जुलूम, राजेंद्र सावंत, मंगेश मोरे, सखाराम वांद्रे, उपविभाग प्रमुख शैलेश गवळी, विलास नायर, मंदार स्वर्गे, शाखाप्रमुख संजय मांजरेकर, अभय दिघे, मंगेश सरमळकर, हेमंत धिमावकर, राजू पवार, प्रियांका कार्लेकर, श्रध्दा नाईक, समीर सबनीस, विकी ठोंबरे, पंडित पाटील, वैभव संते, अनुज मोरे, स्वप्निल पाटील, मुकुंद म्हात्रे, सुनील पाटील, अनंत बडेकर, संदीप पालकरी या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.


