ठाणे रेल्वे स्थानकाजवळील रुळांवर गर्दुल्ल्यांचा वावर

गांजा सेवन करणारा एकजण ताब्यात

ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील रेल्वे रुळालगत गांजा या अमली पदार्थाचे सेवन करताना ३० वर्षीय व्यक्ती आढळून आला. राम राठोड असे त्याचे नाव असून लोहमार्ग पोलिसांच्या गुन्हे प्रतिबंधक पथकाने त्याच्याविरोधात कारवाई केली. त्याच्याविरोधात ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मध्य रेल्वे मार्गावरील सर्वाधिक गर्दीच्या रेल्वे स्थानकांपैकी ठाणे रेल्वे स्थानक आहे. दिवसाला लाखो प्रवासी या स्थानकातून प्रवास करतात. असे असले तरी रेल्वे रुळांलगत गर्दुल्ल्यांचा वावर देखील वाढल्याचे दिसते. रेल्वे रुळांलगत बसून गर्दुल्ले अमली पदार्थांचा नशा करत असतात.

शुक्रवारी रात्री लोहमार्ग पोलिसांचे गुन्हे प्रतिबंधक विभाग ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एकजवळील रेल्वे रुळांलगत गस्ती घालत होते. रात्री १०.१५ वाजताच्या सुमारास एक व्यक्ती गांजा या अमली पदार्थाचे सेवन करताना पथकाला आढळून आला. त्यामुळे पथकाने त्याला ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात आणले. त्याची चौकशी केली असता, त्याचे नाव राम राठोड असून तो मुंबईतील चेंबुर भागातील रहिवासी असल्याचे आढळले. त्याची झडती पोलिसांनी घेतली असता, त्याच्याकडे चिलीम, गांजा, आगपेटी आणि अर्धवट जळालेले कापड आढळून आले. त्याला वैद्यकीय तपासणीसाठी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. त्यावेळी त्याने गांजा या अमली पदार्थाचे सेवन केल्याचे अहवालात आढळून आले. शनिवारी याप्रकरणी त्याच्याविरोधात ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधीदव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे प्रदार्थ अधिनियम, १९८५ चे कलम २७, ८ (क) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top