नवी मुंबई महानगरपालिकेची 26 नागरी आरोग्य केंद्रे, 2 माता बाल रुग्णालये व 3 सार्वजनिक रुग्णालये याव्दारे नागरिकांना आरोग्य सेवा पुरविल्या जात असून त्यामधील गुणवत्ता वाढीसाठी आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने नियमितपणे आढावा बैठका घेतल्या जात आहेत.
यामध्ये प्राथमिक स्तरावरील वैद्यकिय तपासणी व उपचार नागरी आरोग्य केंद्राच्या माध्यमातून केले जात असून त्यांच्याकडे उपलब्ध होणा-या नागरिकांच्या आरोग्य स्थितीची माहिती अचूक व अद्ययावत असावी याकडे बारकाईने व काटेकोर लक्ष देण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.
विविध प्रकारचे लसीकरण कार्यक्रम राबवितांना त्यामध्ये मोठया प्रमाणात सहभाग मिळावा व जास्तीत जास्त नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा यादृष्टीने मोठ्या सोसायट्या, झोपडपट्टी भाग या ठिकाणी जागरूकता शिबीरे घ्यावीत. तसेच नागरिकांमध्ये याविषयी जनजागृती करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांचा सहभाग
घ्यावा अशा सूचना आयुक्त महोदयांनी यावेळी केल्या. यासाठी आरोग्य कर्मचारी यांना प्रोत्साहित करावे व स्थानिक पातळीवर नगरसेवकांचे सहकार्य घ्यावे असेही सूचित करण्यात आले.
आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर साथरोगाचा धोका लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक कार्यवाही आत्तापासूनच प्रभावीपणे सुरु करावी असे निर्देशित करतांनाच मलेरिया प्रतिबंधासाठी सर्वात जोखमीचे क्षेत्र असलेल्या बांधकाम साईट्सवर लक्ष केंद्रीत करावे असेही सूचित करण्यात आले.
महानगरपालिकेच्या टेस्टिंग लॅबमध्ये थैलेसेमिया, स्वाईन फ्ल्यू अशा चाचण्या करण्याबाबत कार्यवाही करावी असेही निर्देश देण्यात आले. त्याचप्रमाणे ऑक्सिजन प्लान्टची स्थलांतरण कार्यवाही जलद करावी आणि सर्व व्हेन्टिलेटर उपयोगात आणण्याच्या दृष्टीने नियोजन करावे असेही आयुक्त महोदयांनी सूचित केले. आयुष्मान भारत कार्डची वितरण कार्यवाही जलद करावी तसेच महानगरपालिकेकडे उपलब्ध होणारी सर्व प्रकारच्या रुग्णांची माहिती डिजीटल करण्याबाबतही पावले उचलावीत असेही सूचित करण्यात आले.
महानगरपालिकेच्या रुग्णालयातील माता-बाल मृत्यूची माहिती घेतांना प्रत्येक मृत्यूची कारणमीमांसा जाणून घेऊन डेथ ऑडिट करण्याच्या सूचना देतानाच या मृत्यूमागील कारणांचा अभ्यास करुन पुढील काळातील सुयोग्य उपचारांसाठी व मृत्यूदर कमी करण्यासाठी त्या माहितीचा उपयोग करुन घ्यावा अशा सूचना आयुक्तांनी केल्या.
या प्रसंगी वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. राजेश म्हात्रे, उपआयुक्त डॉ. अजय गडदे, सहा. आरोग्य अधिकारी डॉ. धनवंती घाडगे व डॉ. रत्नप्रभा चव्हाण तसेच तिन्ही सार्वजनिक रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक, दोन माता बाल रुग्णालयांचे वैदयकिय अधिकारी, विविध आरोग्य विषयक कार्यक्रमांचे वैद्यकिय अधिकारी आणि पीजी मेडिकल इन्स्टिट्यूटचे डिन डॉ. ज्ञानेश बेलेकर उपस्थित होते.


