मुरबाडच्या संतोष चौधरींना भाजपकडून मोठी जबाबदारी

ठाणे जिल्हा ग्रामीण सचिवपदी नियुक्ती

भारतीय जनता पक्षाच्या ठाणे जिल्हा ग्रामीण संघटनेत मुरबाड तालुक्याला महत्त्वाचे स्थान मिळाले असून मुरबाड येथील सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेले संतोष गजानन चौधरी यांची भाजप ठाणे जिल्हा ग्रामीण सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष जितेंद्र डाकी यांनी नियुक्तीपत्र देऊन ही घोषणा केली. संतोष चौधरी हे मुरबाड मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांचे निकटवर्तीय व समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या नियुक्तीमुळे मुरबाड तालुक्यासह संपूर्ण ठाणे ग्रामीण भागातील भाजप संघटन अधिक बळकट होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.


यावेळी आमदार किसन कथोरे यांनी संतोष चौधरी यांचे अभिनंदन करून त्यांच्या आगामी राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पक्षाने दिलेली जबाबदारी ते यशस्वीपणे पार पाडतील आणि संघटन वाढीसाठी प्रभावी काम करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नियुक्तीप्रसंगी टीडीसी बँकेचे संचालक अरुण पाटील, भाजप मुरबाड तालुकाध्यक्ष दीपक पवार, तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष संतोष पवार, मुरबाड नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मोहन गडगे, माजी नगराध्यक्ष मोहन सासे, मुकेश विशे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Scroll to Top